लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजपाप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ केव्हा घेणार?, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा कधी शपथ घेणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत १७वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस करण्यात आली. सध्याच्या म्हणजे १७व्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून रोजी संपत आहे. लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो; परंतु पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात हे विशेष. आता मंत्रिमंडळाने लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली असून, राष्ट्रपतींच्या मान्यतेने १७वी लोकसभा बरखास्त केली जाईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जून रोजी संसदीय पक्षाची बैठक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ जून रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होऊ शकतो.
(हेही वाचा – R Praggnanandhaa : आर प्रग्यानंदाचा चिनी जगज्जेता डिंग लिरेनलाही दे धक्का )
लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी, ( ४ जून) जाहीर झाले. ५४३ जागांपैकी भाजप २४०, तर काँग्रेसने ९९ जागा जागा जिंकल्या आहेत. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला २९२, तर इंडिया आघाडीने २३४ जागांवर विजय मिळवला आहे. या निकालावरुन देशात पुढील सरकार हे आघाडीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकार स्थापनेबाबत आज एनडीएची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत, मात्र यावेळी भाजपला सरकार चालवण्यासाठी मित्रपक्षांच्या पाठिंब्याची गरज आहे. विशेषतः जेडीयू आणि टीडीपीचा पाठिंबा आवश्यक असेल. दोन्ही पक्षांनी एनडीएला पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले आहे.
कष्टांची भरपाई शब्दांतून होणार नाही
लोकसभा निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर ‘X’वर पोस्ट करून जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, ”लोकांनी NDAवर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला, भारताच्या इतिहासातील हा ऐतिहासिक क्षण आहे. जनता जनार्दनसमोर मी नतमस्तक होत आहे, गेल्या दशकभरात लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करताना जी चांगली कामे केली आहेत, ती पुढे सुरू राहतील. मी आमच्या कार्यकर्त्यांना नमन करोत. त्यांनी केलेल्या कष्टांची भरपाई शब्दांतून होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.