नरेंद्र पाटलांना शिवसेना सोडायला भाग पाडणारे ‘ते’ नेते कोण?

माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र पाटील यांनी शिवसेना पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.

146

राज्यात सध्या एकावर एक अशा राजकीय घडामोडी सुरू असून, आता माजी आमदार आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पण यावेळी त्यांनी मी पक्षात राहू नये, असे काही नेत्यांना वाटत असल्याने मी शिवसेना सोडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे नरेंद्र पाटलांना शिवसेना सोडायला भाग पाडणारे ‘ते’ शिवसेनेचे नेते कोण? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. एवढेच नाही तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माझ्यात चांगले संबंध असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांना खूपत असल्याचे ते म्हणालेत. माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये नरेंद्र पाटील यांनी शिवसेना पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री वेळ देईनात!

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन दीड वर्ष झाले. तरी देखील मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवलेले नाहीत. माथाडींच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी वेळ मागूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झालेली नाही, असेही पाटील म्हणाले.

(हेही वाचा : रश्मी ठाकरे यांना कोरोना!)

कोण आहेत नरेंद्र पाटील?

नरेंद्र पाटील काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते भाजपमध्ये आले. मात्र, २०१९ मध्ये साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, त्या निवडणुकीत उदयनराजे भोसलेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.

दोनच दिवसांपूर्वी व्हिडिओ व्हायरल!

नरेंद्र पाटील यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची महामार्गावर गळाभेट घेतल्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये नरेंद्र पाटील आणि उदयनराजे भोसले हे दोघेही महामार्गावर अचानक गाडी थांबवतात आणि एकमेकांची गळा भेट घेताना दिसत आहेत. पण यावेळी सातारा खासदारकीची निवडणूक लढण्यासाठी शिवबंधन बांधलेले नरेंद्र पाटील हे ‘आपले साहेब मुख्यमंत्री होणार’ म्हणजेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे बोलून ही गळाभेट घेत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.