शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांचा जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा

183

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाला आव्हान देत बंडखोरी केली आहे. त्यात तब्बल ४० आमदार त्यांच्यासोबत आसाममध्ये आहेत. गेले आठवडाभर हे राजकीय नाट्य सुरू आहे. दरम्यान ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तेथेही शिंदे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचे जवळचे ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी शनिवारी रात्री जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला. म्हस्के यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपला राजीनामा सादर केला आहे. या पत्रात त्यांनी आपल्या मनातील खदखद आणि भावना व्यक्त केल्या आहेत.

(हेही वाचा – राज्यपालांची कोरोनावर मात, रूग्णालयातून डिस्चार्ज; सत्ताबदलाच्या हालचालींना येणार वेग?)

काय म्हटले पत्रात?

म्हस्के यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडीसोबत राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर गेली अडीच वर्षे शिवसेनेची ‘राष्ट्रवादी’ गळचेपी चालली असून त्याचा निषेध म्हणून आपण जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत आहे. भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा… जात, गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना…! त्यामुळे शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच… पण गेली अडीच वर्षे आपल्या संघटनेची ‘राष्ट्रवादी’ गळचेपी चालली आहे.

mhaske

एकीकडे शिवसेनेच्या आमदारांवर सरकारमध्ये असताना अन्याय होत होता, मात्र ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणावरही अन्याय होऊ दिला नाही. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी निधी वितरीत केला. त्यांनी नेहमीच पक्षाच्या विकासाचाच विचार केला. म्हणूनच त्यांनी जे केले ते योग्यच होते. आम्ही आजही शिवसैनिक आहोत. आम्ही शिवसेनेतच आहोत. ठाणे महानगरपालिकेतील सर्व ६७ माजी नगरसेवक पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आहेत. धर्मवीर आनंद दिघे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनीच ठाणे जिल्ह्याचे नेतृत्व केले आणि म्हणूनच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहोत, असेही ते पुढे म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.