काँग्रेस पक्षामध्ये राजीनामा सत्र सुरूच आहे. आता काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारक या पदाचा राजीनामा दिलेला आहे. राज्यातील ४८ जागांवर एकही मुस्लिम उमेदवार न दिल्याने नसीम खान यांनी पक्ष श्रेष्ठीकडे नाराजी व्यक्त करत आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीतच काँग्रेसच्या या स्टार प्रचारकाने राजीनामा दिल्याने काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद तथा नाराजी चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान नसीम खान यांनी राज्यात काँग्रेस पक्षाने एकही मुस्लिम उमेदवार दिला नसला तरी उत्तर-मध्य मुंबईत खान यांना उमेदवारी न मिळाल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे.
वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळताच पडसाद उमटले
मुंबईतील सहा लोकसभा मतदान संघापैकी चार मतदान संघ शिवसेना उबाठा पक्षाच्या वाट्याला गेले आहेत. त्यामुळे उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोनच मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आलेले आहेत. यातील उत्तर – मध्य मुंबईत नसीम खान आणि इतर इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत होती. मात्र, वर्षा गायकवाड यांच्या नावाची कुठेही चर्चा नव्हती. मात्र शेवटच्या क्षणाला मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आणि आमदार वर्षा गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीनंतर दुसऱ्याच दिवशी नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठवला. खान यांनी आपल्या राजीनाम्यामध्ये असे म्हटले आहे की, राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघामध्ये काँग्रेसच्या वतीने एकाही अल्पसंख्यांक समाजातील उमेदवाराला संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे आपण स्टार प्रचारक पदाचा राजीनामा देत जबाबदारीतून मुक्त होत आहे.
(हेही वाचा Varsha Gaikwad : उत्तर मध्य मुंबईत मानस कन्येला निवडून आणण्यासाठी ठाकरेंचे शिवसैनिक करणार हाताला मतदान)
वर्षा गायकवाड यांच्या विरोधात नाराजी
वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देत एक प्रकारे पक्षाने नसीम खान यांचा पत्ता कापला आहे. उत्तर-मध्य मुंबईतून प्रिया दत्त यांनी पुन्हा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने तसेच बाबा सिद्दीकी हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने याठिकाणी आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास नसीम खान यांना होता. परंतु वर्षा गायकवाड यांनी जागा वाटपाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीला जात हाय कमांडची भेट घेतली आणि नाराजी व्यक्त करत दक्षिण मध्य मुंबईच्या बदल्यात उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी आपल्या पारड्यात पाडून घेतली. वर्षा गायकवाड यांच्यासोबत नसीम खानही दिल्लीत गेले होते. पण आपली मदत घेतली, पण आपल्याला उमेदवारी मिळवून देण्याऐवजी गायकवाड यांनी स्वतःलाच उमेदवारी मिळवली याचा राग व्यक्त करण्यासाठी नसीम खान यांनी या स्टार प्रचारक पदाचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस पक्षाला जागा वाटपात दुय्यम जागा दिल्या जात असल्याने यापूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार नसीम खान, माजी खासदार संजय निरुपम आदींनी राजीनामा देत काँग्रेस पक्षाला रामराम केला आहे. या पार्श्वभूमीवर नसीम खान यांचा स्टार प्रचारक या पदाचा राजीनामा महत्वाचा आणि विचार करण्यासारखा आहे.
Join Our WhatsApp Community