सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा, राधाकृष्ण विखे-पाटलांची माहिती

119

येत्या ३० जानेवारीला राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यातील नाशिक पदवीधर मतदारसंघ चांगलाच चर्चेत आला. कारण सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. सुधीर तांबेंकडे पक्षाचा एबी फॉर्म देखील होता. पण तरीही सुधीर तांबेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही आणि दुसरीकडे त्यांचे सुपुत्र म्हणजेच सत्यजित तांबे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सत्यजित तांबेंनी उमेदवारी दाखल केल्यापासून यामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जात होते. तसेच भाजप त्यांना पाठिंबा देणार अशा चर्चांनाही उधाण आले. असे असताना तांबेंना भाजप कार्यकर्त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जाहीर केली आहे.

प्रसार माध्यमांसोबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, ‘सत्यजित तांबेंना मतदान करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरील भाजप कार्यकर्त्यांचा झालेला आहे. सत्यजित तांबे तरुण, होतकरू आहेत. त्यांनी संधी दिली पाहिजे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे. तसेच त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यास सुरुवात झाली आहे.’

दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील अशी मुख्य लढत असणार आहे. शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातून कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष्य वेधले आहे.

(हेही वाचा – मराठवाडा शिक्षक मतदारसंघात शेवटच्या क्षणी ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.