सध्या राज्यात विधानपरिषदेच्या ५ जागांवरील निवडणुकांमुळे राज्याचे राजकारण शिगेला पोहचले आहे. सोमवार, १६ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर मात्र वाद विवाद सुरु झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक चर्चा नाशिक पदवीधर मतदार संघाची सुरु आहे. या मतदार संघात शिवसेनेने अपेक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे, मात्र महाविकास आघाडीमधील काँग्रेसची मात्र शिवसेना पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत एकमत नाही, त्यावर उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ज्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे.
काँग्रेसमुळे गोंधळ
या ठिकाणी काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे, त्यांना भाजपने पाठिंबा दिला असल्याने काँग्रेस त्यांची कधीही हकालपट्टी करेल अशी शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या या गोंधळामुळे महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर शिवसेनेने पाठिंबा दर्शवलेल्या शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार असल्याचे शेवटच्या क्षणी जाहीर करण्यात आले. या सगळ्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना सूचक इशारा दिला.
(हेही वाचा सोशल मीडियाच्या ‘boycott’ ने बॉलिवूड हादरले)
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत म्हणाले, ‘शुभांगी पाटील ज्या उमेदवार आहेत, त्या काल भेटल्या आणि त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांच्याकडे मागितला आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिला, कारण त्यांची तयारी आम्ही पाहिली आणि आम्हाला असे वाटले की त्या लढतीमध्ये चांगल्याप्रकारे पुढे जाऊ शकतात. यासंदर्भात आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सूचना केली आहे आणि त्या योग्य उमेदवार आहेत. या पार्श्वभूमवीर उद्धव ठाकरे यांनी उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत, की आपल्याला शुभांगी पाटील यांच्या मागे उभा राहायचे आहे. एकत्र बसून नक्कीच सुरुवातीला चर्चा झाली होती. त्यानुसार नागपूर शिवसेनेसाठी सोडले होते, पण शेवटी प्रत्येकवेळी त्याग करण्याची जबाबदारी ही शिवसेनेवरच असते आणि विरोधकांचे ऐक्य वैगेरे या महान शब्दांना महत्त्व देऊन आम्ही हा त्याग करत आलो. पण यापुढे असे होणार नाही. यापुढे आम्ही आमच्या भूमिका ठरवू, अशा शब्दांत संजय राऊतांनी घटक पक्षांना सूचक इशारा दिला.
Join Our WhatsApp Community