मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या अल्टिमेटम नंतर बुधवारपासून ज्या मशिदींवर भोंगे लागतील त्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले होते. त्याप्रमाणे बुधवारी पहाटे नाशिकमधील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मशिदीबाहेर हनुमान चालिसा लावण्याच्या तयारीत होते. या 27 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आता पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचाः पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातही काकड आरती लाऊडस्पीकरविना)
न्यायालयाने केले हद्दपार
नाशिक येथील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मशिदीबाहेर पहाटे घोषणाबाजी करणा-या सहा महिला पदाधिकारी, सरकारवाडा पोलिस ठाणा हद्दीतील 7 पदाधिकारी आणि इंदिरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंदोलनाच्या तयारीत असलेले 14 कार्यकर्ते अशा एकूण 27 मनसैनिकांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना 15 दिवसांसाठी शहर तसेच जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत.
(हेही वाचाः मनसेच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड; अटी शर्तीसह जामीन मंजूर)
हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न
बुधवार पेठेतील जबरेश्वर हनुमान मंदिराजवळ चार अज्ञात व्यक्तींकडून बुधवारी पहाटे भोंग्यांवरुन हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी सतर्क असलेल्या भद्रकाली पोलिसांनी धाव घेत भोंगे आणि इतर साहित्य जप्त केले. तसेच या चारही जणांवर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community