नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा नव्याने समन्स बजावले आहे. आता त्यांना 13 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने त्यांना १३-१४ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने यापूर्वी त्यांना 2 जून रोजी बोलावले होते, मात्र ते सध्या परदेशात असल्याने त्यांना चौकशीला हजर राहता आले नव्हते. यानंतर राहुल गांधींनी ईडीला पत्र लिहून विनंती करत चौकशीसाठी नवीन तारीख मागितली होती.
(हेही वाचा- हिंदूंना बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण सरकारने द्यावं; मनसेची मागणी)
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही चौकशी होणार आहे. त्यांना ईडीने ८ जून रोजी बोलावले आहे. मात्र, सोनिया गांधी यांना गुरूवारी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे असे सांगितले जाते की, जर सोनिया बऱ्या झाल्या तर त्या नक्कीच चौकशीला उपस्थित राहतील. दरम्यान, सोनिया गांधींनंतर आता शुक्रवारी प्रियंका गांधींनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?
नॅशनल हेराल्डचा मुद्दा 2012 मध्ये चर्चेत आला. त्यानंतर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रायल कोर्टात याचिका दाखल करून आरोप केला की, काही काँग्रेस नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड हे यंग इंडियन लिमिटेड (YIL) मार्फत विकत घेतले. दिल्लीतील बहादूर शाह जफर मार्गावर असलेल्या हेराल्ड हाऊसची 2000 कोटी रुपयांची इमारत ताब्यात घेण्यासाठी हे सर्व केल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामींनी केला होता. या कारस्थानाच्या अंतर्गत यंग इंडियन लिमिटेडला TJL च्या मालमत्तेचा अधिकार देण्यात आला आहे.