पक्षीय अभिनिवेश दूर सारत देशभरातील दीड हजार आमदार शुक्रवारी मुंबईत एकत्र आल्याचे पहायला मिळाले. निमित्त होते ‘राष्ट्रीय आमदार परिषदे’चे. १५ ते १७ जून या कालावधीमध्ये मुंबईच्या बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी या परिषदेचे उद्घाटन झाले. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर, सुमित्रा महाजन, मीरा कुमार, शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, पद्मश्री अनिल गुप्ता, ‘एमआयटी’चे विश्वनाथ कराड उपस्थित होते.
या परिषदेसाठी देशभरातील २ हजार आमदारांनी नोंदणी केली आहे. शुक्रवारी उद्घाटन सत्राला दीड हजार आमदार उपस्थित होते. त्यात १५८ महिला आमदारांचा समावेश आहे. लोकशाहीच्या सक्षमीकरणाकरिता आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेच्या निमित्ताने देशभरातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील आमदार, आजी-माजी लोकसभा अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे विधानसभा अध्यक्ष, विधान परिषद सभापती उपस्थित राहणार आहेत. तसेच देशाच्या विकासाशी निगडीत विविध मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अनेक विषयांचा मागोवा घेणारे व भविष्याचा वेध घेणाऱ्या विषयांच्या अनुषंगाने अनेक परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती या परिषदेचे आयोजक राहुल कराड यांनी दिली.
६ राज्यांत सामंजस्य करार
- या परिषदेदरम्यान ६ राज्यांनी परस्परांशी सामंजस्य करार केले. महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, हिमाचल, कर्नाटक, गोवा या राज्यांचा यात समावेश आहे.
- शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात आमदारांनी रॅम्प वॉक केला. ‘रॅम्प ऑफ डेमोक्रसी’ असे या कार्यक्रमाला नाव देण्यात आले होते. सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी हा यामागील उद्देश होता.