राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे ट्वीट केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाल आले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याविरोधात 72 तासांच्या आत पोलिसांनी दोन खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोपही ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.
पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही 😭३५४ ,.,
मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 14, 2022
ही लोकशाहीची हत्या असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आपल्याविरोधातील अत्याचाराविरोधात लढा देणार असल्याचे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान, आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंंब्रा पोलीस ठाण्याबाहेर आंदोलनही केले होते.
आव्हाडांवर काय आरोप?
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या पदाधिका-यांचा आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीदरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप भाजप महिला मोर्चाच्या पदाधिका-यांकडून करण्यात आला आहे. भाजपच्या महिला पदाधिका-यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात मुंब्रा पोलिसांत विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिका-यांच्यावतीने करण्यात आली आहे.