आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्यांच्यावरील गुन्हे रद्द करण्याची मागणी केली. त्यावर सोमवार, २५ एप्रिल राजी सुनावणी झाली तेव्हा न्यायालयाने राणा दाम्पत्यावर कलम ३५३ अंतर्गत कारवाई न करण्याविषयी कोणताही आदेश न देता ही याचिका फेटाळून लावली. यानंतर राजद्रोहाच्या आरोपात अटकेत असलेले राणा दाम्पत्याच्या अर्जावर मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली.
(हेही वाचा – रायगडमधील ‘हे’ शहर जगभरातील उष्ण शहरांच्या यादीत पाचव्या स्थानावर)
दरम्यान, राणा दाम्पत्याला सलग दुसऱ्या दिवशीही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावर २९ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने उत्तर दिल्यानंतर या अर्जावर सुनावणी घेण्याची तारीख ठरवण्यात येईल, असे न्यायालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला
त्यामुळे न्यायालयाच्या या स्पष्टीकरणानंतर राणा दाम्पत्याचा कोठडीतील मुक्काम वाढला असून तो २९ तारखेपर्यत असणार आहे. सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी याविरोधात सत्र न्यायालयात दाद मागितली.
राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होणार?
आता २९ एप्रिलपर्यंत सत्र न्यायालयाने राज्य सरकारला उत्तर देण्यासाठी कालावधी दिला आहे. त्यामुळे २९ एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्याला कोठडीत रहावे लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दंडाधिकारी न्यायालायत त्यांनी जामीन याचिका प्रलंबित आहे. कोणतीही कायदेशीर कार्यवाही न करता हे दाम्पत्य न्यायलयात आले असल्याचा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला आहे. त्यामुळे आता राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.