राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरल्यानंतर अटक करण्यात आलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबई सत्र न्यायायलात सुनावणी पार पडली. राणा दामप्त्याला शनिवारी अटक केल्यानंतर रविवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारची तारीख दिली होती. मात्र राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शुक्रवार ऐवजी उद्या शनिवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे दोघांचा तुरुंगातील मुक्काम एक दिवसाने वाढला आहे.
(हेही वाचा – व्याकुळ पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाने उचललं असं पाऊल)
राणा दाम्पत्याचा तुरूंगातील मुक्काम वाढला
दरम्यान, राणा दामप्त्याना अटक केल्यानंतर त्या दोघांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापार्श्वभूमीवर राणा दाम्पत्याकडून मुंबई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता, या अर्जावर आज सुनावणी होणार होती. मात्र सुनावणीला सुरूवात झाल्यानंतर व्यस्त कामांमुळे पुढील सुनावणी लांबणीवर गेल्याचे न्यायमूर्तींनी सांगितले त्यामुळे आणखी एक दिवस राणा दाम्पत्याला तुरूंगात राहवं लागणार असल्याचे दिसतेय.
न्यायाधीश काय म्हाणाले…
न्यायाधीश राहुल रोकडे यांनी स्पष्ट केले की, न्यायालयाच्या आजच्या वेळापत्रकानुसार, इतर महत्त्वाची प्रकरणंही सुनावणीसाठी आहेत. न्यायालयाकडे आज जराही वेळ नाही. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी घेण्यात येणार आहे. २४ एप्रिलपासून राणा दाम्पत्य हे न्यायालयीन कोठडीत असून त्यांनी केलेल्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती. व्यस्त कामकाजामुळे न्यायालयाच्या वतीने गेल्या सुनावतीच स्पष्ट करण्यात आले होते की, शक्य झाल्यासच आम्ही शुक्रवारी ही सुनावणी घेऊ. त्यानुसार, आज याचिकाकर्त्या राणा दाम्पत्याचे वकिल आबाद फोंडा यांनी युक्तीवाद केला. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की, याचिकाकर्ते दाम्पत्य निवडून आलेले आमदार आणि खासदार आहेत. हे प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी आज थोडा वेळ का होईना न्यायालयाला शक्य असल्यास ते युक्तीवाद करण्यास तयार आहेत. ते सराईत गुन्हेगार नाहीत. ते कुठेही पळून जाणार नाहीत. त्यांनी कोणताही गंभीर गुन्हा केलेला नाही.
(हेही वाचा – Money Laundering Case : अनिल देशमुखांचा कोठडीतील मुक्काम वाढला)
दरम्यान विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी राज्य सरकारच्या वतीने राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला. संपूर्ण प्रकरणावर लेखी म्हणणंही सादर केले. यात म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांच्या बाबत अपशब्द वापरून त्यांना चॅलेंज केले. तसेच शासनाला चॅलेंज केले आहे. त्यांना १४९ अंतर्गत नोटीस देण्यात आली होती की, तुम्ही शांतता ठेवणं तुमचं कर्तव्य आहे त्यामुळे तुम्ही परत जा. पण त्यांनी त्या नोटीसला न जुमानता शासनाला आव्हान दिलं. आरोपींविरोधात १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणांना जामीन देण्यास सरकारचा विरोध
- 1. राजद्रोहाचं १२३ (अ) कलम लावल्याने जामीन मंजूर करू नये – मुंबई पोलीस
- 2. आरोपींविरोधात यापूर्वी १७-१८ गुन्ह्यांची नोंद
- 3. नवनीत राणा यांच्याविरोधात जातीचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप
- 4. नवनीत राणांनी शाळेच्या दाखल्यात फेरफार केल्याचा गुन्हा मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल
- 5. बाहेर पडल्यावर आरोपी पुन्हा कायदा-सुव्यस्था बिघडवण्याती शक्यता असल्याचा पोलिसांचा दावा