राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरल्यानंतर अटक करण्यात आलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबई सत्र न्यायायलात सुनावणी पार पडली. राणा दामप्त्याला अटक केल्यानंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारची तारीख दिली होती. मात्र राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शुक्रवार ऐवजी आज शनिवारी सुनावणी झाली. मात्र न्यायालयाने सोमवारपर्यंत राणा दामप्त्याचा निकाल राखून ठेवल्याने त्यांना सलग दुसऱ्या दिवशीही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे याप्रकरणी राणा दाम्पत्याचा फैसला सोमवारी होणार असल्याचे समोर आले आहे.
(हेही वाचा – राणा दाम्पत्याला दणका! न्यायालय म्हणतंय, तुरुंगातलंच जेवण करा!)
काय आहे प्रकरण?
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील जाहीर सभेत मशिदींवरील भोंगे उतरविण्यासंदर्भात विधान केल्यानंतर राज्यातील राजकारणात एकच खळबळ उडाली. मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. यानंतर २३ एप्रिल रोजी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा केली. यामुळे राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आणि त्याचे तीव्र पडसाद मुंबईत उमटले.
त्यानतंर शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केले. तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता. अखेर मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत आपली घोषणा मागे घेतली. त्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्यास अटक केली आणि त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या खासदार नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत, तर आमदार रवी राणा तळोजा कारागृहात आहेत.
Join Our WhatsApp Community