एनसीबीने क्रूझवर छापेमारी केल्यानंतर त्यामधून किंग खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाली. मात्र ही कारवाईच बनावट आहे. एनसीबीने भाजपाचा उपाध्यक्ष मनीष भानुशाली याला घेऊन ही छापेमारीची करावी केली होती, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.
मनीष भानुशाली कोण?
यावेळी नवाब मलिक यांनी एनसीबीच्या कारवाईच्या पथकात खासगी लोकांचा समावेश कसा करण्यात आला? कारवाईच्या वेळी आर्यन खान याला घेऊन जाताना मनीष भानुशाली दिसत होता. तो एनसीबीचा अधिकारी नव्हता, तो भाजपचा कार्यकर्ता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याचे फोटो आहेत. अशा रीतीने एनसीबीदेखील भाजपाची शाखा बनली आहे. त्यामुळे एनसीबीने मनीष भानुशाली याचा खुलासा करावा, असे मलिक म्हणाले.
(हेही वाचा : पालघरमध्ये शिवसेनेला धक्का, राजेंद्र गावितांच्या मुलाचा पराभव)
बॉलिवूडला बदनाम करण्याचा कट
भाजपा मागील वर्षभरापासून एनसीबीच्या माध्यमातून खोटेनाटे छापे टाकून बॉलिवूडची बदनामी करत आहे. आर्यन खान याच्यावरील कारवाई हा बनाव आहे, असा आमचा आरोप आहे, असेही मलिक म्हणाले. या कारवाईत मनीष भानुशाली हा आठवड्यापूर्वी दिल्लीत होता, त्यानंतर तो गुजरातमध्ये मंत्र्यांसोबत होता. एनसीबीचा मनीष भानुशालीशी काय संबंध होता, हे स्पष्ट करावे, असेही नवाब मलिक म्हणाले.
सध्या के.पी.गोसावी आणि भानुशाली यांची फेसबुक प्रोफाईल लॉक आहे. पण भानुशालीची हालचाल आम्ही शोधून काढली असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. भानुशाली हा २१ आणि २२ सप्टेंबर रोजी गुजरातमधील काही मंत्र्यांना भेटला होता. २१ सप्टेंबर रोजीच अदानी पोर्टवर अफगाणिस्तान येथून आलेले हजारो कोटींचे ड्रग्ज सापडले होते. त्यानंतर २८ तारखेला पुन्हा एकदा भानुशाली गुजरातमधील मंत्रालयात जाऊन राणा नावाच्या मंत्र्याला भेटला होता. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत कारवाई झाल्यानंतर त्याच कारवाईत भानुशाली कसा काय सामील होता? मनिष भानुशालीचे गुजरातमधील अदानी बंदरावर सापडलेल्या ड्रग्जचा काय संबंध आहे? तसेच भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष कसा? याची उत्तरे एनसीबी आणि भाजपने दिली पाहिजेत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
३ ऑक्टोबरच्या कारवाईनंतर एनसीबीने स्वतःहून क्राईम रिपोर्टर्सना या कारवाईचे व्हिडिओ दिले होते. त्या व्हिडिओमध्ये हे दोन खासगी लोक अटक करताना स्पष्ट दिसत आहेत. के.पी. गोसावी या व्यक्तीने आर्यन खानची अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता. हा सेल्फी बराच व्हायरल झाला. त्यानंतर एनसीबीने ट्विट करुन के. पी. गोसावी अधिकारी नसल्याचे सांगितले. के.पी. गोसावीवर पुण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या फेसबुकवर तो खासगी हेर असल्याचे स्टेटस ठेवतो. के.पी.गोसावीचा एनसीबीशी काय संबंध आहे? हे आता समोर आले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.
Join Our WhatsApp Community