नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोटाच्या आरोपीकडून जमीन विकत घेण्याचे कारण काय? या व्यवहारानंतर मुंबईत तीन वेळा हल्ले झाले आणि बॉम्बस्फोट झाले आहेत, जे लोक बॉम्बस्फोट करतात, त्यांना तुम्ही पैसे देता हे चुकीचे आहे. ईडीने बॉम्बस्फोटात जे आरोपी तुरुंगात आहेत, त्यांचीही जबानी घेतली आहे. यातील टेरर फंडींगचा अँगल स्पष्ट दिसत आहे. ईडीने यासंबंधीचे पुरावे न्यायालयात सादर केल्याने न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
टेरर फंडिंग लिंक
हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. एनआयए आणि ईडीने मोठे ऑपेरेशन केले, त्यामध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा बांधकाम क्षेत्रात पॆसा घालत आहे, त्यात टेरर फंडिंग सुरु आहे, हे ईडीला लक्षात आले. त्यासाठी ईडीने ठिकठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यातीलच एक जमीन व्यवहार हे नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे, हे समोर आले. ती जमीन मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीकडून खरेदी केली होती, हे समोर आले. यात जे व्यवहार झाले त्यामध्ये दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या खात्यात ५५ लाख जमा केल्याचे सामोर आला आहे. याचे सर्व पुरावे ईडीला मिळाले आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
राजीनामा घेतला नाही तर चुकीचा पायंडा
नवाब मलिक यांना राजकीय गुन्ह्याखाली अटक करण्यात आली नाही, तर त्यांचा संबंध हा देशविरोधी कृत्य करणाऱ्या कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधी आहे. अशा वेळी मलिक यांच्या राजीनामा घेतला नाही तर वेगळा पायंडा पडेल, देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे, असा संदेश दिला जाईल.
Join Our WhatsApp Community