आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी गजाआड असलेल्या नवाब मलिक यांना आता त्यांच्या स्वपक्षानेही दूर केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने नुकतीच आपली राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर केली असून, त्यात नवाब मलिक यांना डच्चू देण्यात आला आहे.
( हेही वाचा : गणेश मंडप हटवा; अन्यथा पुढच्या वर्षी परवानगी नाही, पुणे महापालिकेचे आदेश)
नवा मलिक यांना अटक केल्यानंतरही राष्ट्रवादीने त्यांचे मंत्रिपद कायम ठेवले होते. त्यावरून चौफेर टीका झाल्यानंतरही अध्यक्ष शरद पवार आपल्या निर्णयावर कायम होते. मात्र, सत्ताबदल होताच त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा मागे लागलेल्या नवाब मलिकांना त्यांनी आता चार हात लांब ठेवले असून, राष्ट्रीय कार्यकारणीतून त्यांना वगळण्यात आले आहे. याआधी मलिक हे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते होते. नव्या कार्यकारणीत त्यांना स्थान दिलेले नाही. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदी बढती देण्यात आली आहे.
१० आणि ११ सप्टेंबरला नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांना कार्यसमिती सदस्य, स्थायी निमंत्रित, प्रदेशाध्यक्ष, आघाडीच्या संघटना, विभाग इत्यादींसह पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले. यानुसार पवार यांनी कार्यकारिणीची यादी जारी केली आहे. त्यानुसार शरद पवार – राष्ट्रीय अध्यक्ष, प्रफुल्ल पटेल – राष्ट्रीय उपाध्यक्ष, सुनील तटकरे – राष्ट्रीय सरचिटणीस, योगानंद शास्त्री – राष्ट्रीय सरचिटणीस, के के शर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस, पीपी मोहम्मद फैजल – राष्ट्रीय सरचिटणीस, नरेंद्र वर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस, जितेंद्र आव्हाड – राष्ट्रीय सरचिटणीस, वाय पी त्रिवेदी – राष्ट्रीय कोषाध्यक्ष, एस आर कोहली – स्थायी सचिवराजीव, तर हेमंत टकले, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, राजेंद्र जैन यांची नियुक्ती राष्ट्रीय सचिव पदावर करण्यात आली आहे.
नवे प्रवक्ते कोण?
नरेंद्र वर्मा यांची राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रभारी माध्यम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय ब्रिजमोहन श्रीवास्तव, धीरज शर्मा, सोनिया दोहान, सीमा मलिक प्रवक्ते, क्लाईड क्रास्टो यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community