ड्रग्सचा धंदा करणाऱ्यांमध्ये नायझेरियन लोकांचा मोठा सहभाग आहे. मीरा रोडपर्यंत त्यांची वस्ती वाढलेली आहे, उद्या ते मुंबईचा ताबा घेतील आणि पिढी उद्ध्वस्त करतील, त्यामुळे नवाब मलिक आणि त्यांच्या जावयाने या नायझेरियन लोकांच्या पाठिशी राहणे बंद करावे आणि पोलिसांच्या मदतीने आधी त्यांची वस्ती नष्ट करावी, असे भाजपाचे नेते, आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.
‘त्या’ पत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी ईडीला सांगावे
१०० कोटींच्या वसुली प्रकरणात सचिन वाझे याने पत्र दिले आहे. त्यात त्याने अनेकांची नावे लिहिली आहेत. त्यात अनिल परब यांचा उल्लेख आहे, त्यात असेही म्हटले होते कि, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले होते. आता ईडी त्या पत्रात ज्यांची नावे आहेत, त्यांची चौकशी करणार असेल तर उद्धव ठाकरे यांनीही ईडीला भेटून त्या पत्रात म्हटल्याप्रमाणे त्यांना काय अवगत केले होते, त्याची माहिती द्यावी, असेही राणे म्हणाले.
शंभर कोटी वसूल करायला कुणी सांगितले?
शंभर कोटी वाटायला आम्ही सांगितले का, जावयाला ड्रग्स विकायला आम्ही सांगितले का, तुम्ही बार मालक, रेस्टॉरंटचे मालक यांच्याकडून हप्ते वसुली करायची, तो पैसा पचवत असताना जर केंद्रीय यंत्रणांची त्यावर नजर गेली तर मग बोंब मारायची का? चूक तुम्ही करायची आणि आरोप भाजपवर करायचा का? राज्याचा कारभार करण्याऐवजी महाराष्ट्रात लूटमार करत असाल तर कारवाई होणारच, असेही राणे म्हणाले.
(हेही वाचा : अनिल देशमुखांची दिवाळी तुरुंगात; ६ नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी)
फोर सिजनच्या पार्ट्यांविषयी आदित्य ठाकरेंना विचारा
नवाब मलिक आणि संजय राऊतांनी रोज पत्रकार परिषद घ्यावी, त्यामुळे मविआ कुजत चालली आहे, त्याबद्दल आम्हाला समाधान आहे. फोर सिजनमधील पार्टीविषयी अधिक माहिती हवी असेल तर पर्यावरण मंत्र्यांना विचारा. फोर सिजनमध्ये पार्ट्या कधी आणि कशा होतात, याची माहिती त्यांना चांगली आहे. आजूबाजूला विचारण्यापेक्षा त्यांनी मंत्रिमंडळात बाजूला बसणा-या लहान मुलाला जर विचारले कि, तू फोर सिजनमध्ये काय करायचा, तर तो आमच्यापेक्षा चांगली माहिती देईल, असेही राणे यांनी मंत्री आदित्य ठाकरेंवर टीका केली. नवाब मलिकांना जर मविआ अजून खोदायची असेल तर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज काढावेत आपणही कोण कोणत्या टेबलावर बसायचा आणि दिनो मोरियाच्या मांडीला मांडी लावून कोण बसायचा, याचे व्हिडिओ दाखवतो, असा इशाराही राणे यांनी दिला.
परमबीर सिंग मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात आवडते
परमबीर सिंग कुणाचा लाडका? सुशांतसिंग, दिशा सालियनच्या वेळी परमबीर सिंग तुम्हाला पाहिजे, तुमची घाण साफ करण्यासाठी तो पाहिजे. मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंच्या तो सगळ्यात आवडता होता. वर्षा बंगाल असो कि मातोश्री असो तिथे सर्वात जास्त काळ परमबीर सिंग असायचे, मग परमबीर सिंग यांना लपवण्यामागे आदित्य ठाकरे यांचा हात आहे, असे म्हणायचे का?, असेही राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community