नवाब मलिक हे मंत्री आहेत, तरीही ते खोटे बोलत आहेत. ते आपल्या कुटुंबावर जे आरोप लावत आहेत ते खूप घाणेरडे आणि खोटे आहेत. मी कधीही दुबईला गेलो नाही. या आरोपांमुळे एनसीबी करत असलेल्या कारवाईच्या कामात खूप अडथळा येत आहे. याबाबत मी कायदेशीर पावले उचलेन, असा इशारा एनसीबीचे मुंबई क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांनी दिला.
मालदीवला बहिणीसोबत नव्हतो
मी कुटुंबासोबत मालदीवला गेलो होतो. यासाठी मी अधिकृत सुट्टी देखील घेतली होती. याचे पैसे देखील मी स्वत: दिले. तसेच मी बहिणीसोबत मालदीवला गेलो नव्हतो, आमची ट्रीप वेगळी होती, याचे पुरावे देखील माझ्याकडे आहेत, असे सांगत चांगले काम करणा-याला तुम्ही तुरूंगात टाकण्याची भाषा करत आहात, हे योग्य आहे का, असा सवाल वानखेडे यांनी केला.
(हेही वाचा : मालदीवमध्ये फिल्म इंडस्ट्रीकडून वसुली! वानखेडेंच्या कुटुंबावर नवा आरोप)
वानखेडेंना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही! – मलिक
माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता वानखेडे फोन करत आहेत की, यात माझा संबंध नाही. एनसीबी खोट्या केसेस दाखल करत आहे. हे सिद्ध केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. हे अधिकारी आणि भाजपाचे नेते लोकांवर दबाव निर्माण करुन या संस्थेच्या मार्फत हजारो कोटींचा वसुलीचा व्यवसाय महाराष्ट्रात करत आहेत. यांचा घोटाळा उघडीस आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला. पिंपरी-चिंचवड येथे बोलत होते. मी वानखेडेंना आव्हान देतो वर्षभरात त्यांची नोकरी जाईल. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकायला पुढे आले होते. आता देशातील जनता तुम्हाला तुरुंगात जाताना बघेल. तुम्ही किती बोगस माणूस आहात याचे आमच्याकडे पुरावे आहेत. आगामी काळात ते पुरावे आम्ही बाहेर काढणार आहोत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर वरुन दबाव होता, असे वानखेडे सांगतात. पण आता नवाब मलिक कुणाच्या बापाला घाबरत नाही, असेही मलिक म्हणाले. कोरोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, त्यासंदर्भातले फोटो देखील आपण देणार आहे, असेही मलिक म्हणाले.
Join Our WhatsApp Community