कोरोना काळात संपूर्ण फिल्म इंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते, याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत.
पुन्हा एकदा जस्मीन वानखेडेंवर आरोप
समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का, याचे उत्तर अपेक्षित आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले, असे सांगतानाच ही सर्व वसुली मालदीव व दुबईमध्ये झाली, असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
(हेही वाचा : नवाब मलिकांनी कोणता केला नवा दावा? वाचा…)
एनसीबीवरही केला नवीन आरोप
कालच मलिक यांनी एनसीपीवर आरोप करताना पूर्वी रेव्ह पार्टी जेव्हा – जेव्हा झाल्या आहेत, तेव्हा त्या वेळी जे संशयित सापडत होते, त्यांचे रक्त व लघवी नमुन्यासाठी घेऊन संशयितांना सोडले जायचे. त्यानंतर त्यांचा नमुना पॉझिटिव्ह आल्यावर त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जात होते. मात्र या वर्षभरात एनसीबीने ज्यांच्यावर आरोप लावले किंवा ज्यांना अटक केली त्यांचे कोणतेही रक्त किंवा लघवीचे नमुने घेतलेले नाही. ज्या आरोपींना ताब्यात घेतले जात आहे, त्यांचे नमुने पॉझिटिव्ह येणार नसल्याने त्यांची नमुना टेस्ट केली जात नाही. फक्त व्हॉटस्ॲप चॅट आधारावर त्यांना आरोपी ठरवले जाते आहे. त्यांच्या केसेस खोट्या असल्यानेच ते नमुने घेत नसल्याचा आरोप केला आहे.
Join Our WhatsApp Community