लॉकडाऊनवरुन सत्ताधा-यांमध्येच विरोधाचा सूर!

लॉकडाऊन हा आता राज्याला आणि राज्यातील जनतेला परवडणारा नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाऊन करू नये यासाठी आग्रह धरला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. महिन्याभरापूर्वी सापशिडीचा खेळ चालू असलेल्या रुग्णसंख्येत सध्या मात्र कायमच वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊन करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची चर्चा सध्या होऊ लागली आहे. पण यावरुन भाजप नेत्यांनी राज्य सरकारने लॉकडाऊन करू नये, असे सांगत आपला विरोध दर्शवला आहे. पण त्याचबरोबर सत्तेत असणा-या राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सरकार विचार करत असलेल्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकारमधील मंत्र्यांचा या लॉकडाऊनबाबतच्या भूमिकेला विरोध असल्याचे दिसून येत आहे.

काय म्हणाले नवाब मलिक?

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे, पण त्यासाठी लॉकडाऊन हा पर्याय नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे. लॉकडाऊन हा आता राज्याला आणि राज्यातील जनतेला परवडणारा नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांकडे लॉकडाऊन करू नये यासाठी आग्रह धरला आहे, तर त्याऐवजी स्वास्थ्य व्यवस्था वाढवणे गरजेचे असल्याचे आपण सांगितले असल्याचे मलिक म्हणाले. ज्या प्रमाणात सध्या रुग्णसंख्या वाढत आहे त्यानुसार, भविष्यात रुग्णांसाठी बेडची संख्या कमी पडू शकते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य ते निर्देश दिले आहेत. नागरिकांनी जर नियमांचे योग्यप्रकारे पालन केले तर लॉकडाऊन निश्चितच टाळला जाऊ शकतो, असे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.

(हेही वाचाः मातोश्रीत बसून सर्वसामान्यांचा त्रास कसा कळणार? चंद्रकांत पाटलांचा खोचक सवाल)

राजेश टोपे यांची प्रतिक्रिया

पूर्वीप्रमाणे कडक लॉकडाऊन आता होणं शक्य नाही. पण गर्दी टाळण्यासाठी कशा पद्धतीने गोष्टी सध्या करता येतील याकडे सरकारचे लक्ष असणार आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारणे हे महत्त्वाचे आहेच पण त्याचबरोबर लोकांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे, त्यामुळे निर्बंध अधिक कडक करण्याच्या विचारात सरकार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच नवाब मलिक यांच्या प्रतिक्रियेवर बोलताना टोपे म्हणाले की, मतं मांडणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण त्यात कुठल्याही पक्षाचा विरोध आहे असे समजण्याची गरज नाही. सगळ्यांची मतं ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो अंतिम असेल आणि तो सगळ्यांना मान्यही असेल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी राज्य प्रयत्नशील

लसीकरणासाठी महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावरच सरकारला ठेवायचे आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लसीकरण केंद्रांची मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकारकडे आणखी लसींचा पुरवठा करण्याची सुद्धा मागणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील नागरिकांनी लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्यावा असे त्यांनी सांगितले आहे. तसेच काही लोक लक्षणं असताना सुद्धा स्वतःची चाचणी करुन घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे त्यांच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसे न करता लक्षणे आढळत असल्यास वेळीच चाचणी करुन घेण्याचे आवाहनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here