ईडीने नवाब मलिक यांच्या भोवती फास अधिकच घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. ईडीच्या तपासात नवाब मलिक यांच्या नावे बिकेसी येथील आणखी एक भूखंड समोर आला आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबाचा वांद्रे-कुर्ला येथे सुमारे २०० कोटी रुपये किमतीचा भूखंड असल्याची माहिती ईडीला मिळाली आहे.
या भूखंडाच्या व्यवहाराशी संबंधितांची चौकशी
मलिक यांचा मुलगा फराज याच्याकडे टचवुड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची २५ टक्के भागीदारी असून हा भूखंड त्यांच्याच मालकीचा आहे. हा भूखंड २००६ मध्ये खरेदी केला होता आणि त्याचा तीनपट मोबदला देण्यात आल्याचे ईडीला आढळून आले आहे. ईडीकडून या भूखंडाच्या व्यवहाराशी संबंधित लोकांची चौकशी करत आहे.
… अन् फराजच्या अडचणीत वाढ
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर ईडीने त्यांचा मुलगा फराज मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. ईडीने फराज यांना समन्स बजावले असून चौकशीसाठी बोलावले आहे. त्यानंतर फराज मलिक यांच्या वकिलांनी ईडीकडे संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी आठवड्याचा वेळ मागितला होता. मात्र, ईडीने त्यांची विनंती फेटाळून लावल्यामुळे फराज मलिक यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
या याचिकेवर लवकरच होणार सुनावणी
ईडीने दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँडिंग प्रकरणात नवाब मलिक यांना अटक केली असून सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. प्रकृती बिघडल्यामुळे मलिक यांना काही काळ रुग्णालयात दाखल केले होते. मलिक यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांची रवानगी पुन्हा ईडी कोठडीत करण्यात आली आहे. दुसरीकडे मलिक यांनी ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ईडीने दाखल केलेला इसीआर रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. ईडीकडून झालेली अटक बेकायदा असून राजकीय सूडापोटी ही कारवाई केली आहे, असा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. बुधवारी मलिक यांची ईडी कोठडी संपत असून त्यांना बुधवारी दुपारी विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community