मनी लॉण्डरिंग प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली, त्यानंतर त्यांना पीएमएलए विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. रोजची औषधं सोबत बाळगण्यास मुभा देण्यात आली आहे. तसेच घरचे जेवण आणि चौकशी दरम्यान वकिल सोबत बाळगण्याकरता अर्ज सादर करण्यात आला आला, त्यावर गुरुवारी, २३ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे
बुधवारी, २३ फेब्रुवारी रोजी ८ तासांची चौकशी ईडीने केल्यावर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात उशीरापर्यंत युक्तिवाद झाला, त्यानंतर नवाब मलिक यांना पीएमएलए विशेष न्यायालयाने ३ मार्चपर्यत ईडीची कोठडी सुनावण्यात आली. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश आर एन रोकडे यांनी नवाब मलिकला ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आली.
(हेही वाचा नवाब मलिकांचा ‘डी’ गँगच्या टेरर फंडिंगशी संबंध! ईडीचा गंभीर दावा)
‘डी’ गँगच्या हस्तकांशी संबंधित
याआधी ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी युक्तिवाद करताना दाऊदबद्दल काही वेगळे सांगायला नको, तो एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे, दाऊदने अनेक ठिकाणी बेनामी संपत्ती विकत घेतली आहे, त्याची बहीण हसिना पारकर ही त्याची इथली मुख्य हस्तक होती, तिच्या माध्यमातून मोठी संपत्ती गोळा केली. कुर्ला येथील एक विवादीत संपत्ती ही मुळातच ‘डी’ गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. टेरर फंडिंग केले जात होते. तिची संपत्ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या मालकी हक्क असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे, त्यामुळे मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने नवाब मलिकांसाठी १४ दिवसांची कोठडी मागितली. आरोपीला ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशीची गरज आहे, असे ईडीचे वकील एएसजी अनिल सिंह म्हणाले.
ईडीच्या तपासात असे निष्पन्न झाले की, कुर्लामधील गोवावाला कंपाऊंड मालमत्ता वारसा हक्काप्रमाणे मरियम आणि मुनिरा प्लंबर यांच्या मालकीची होती. ती मालमत्ता नवाब मलिक यांच्या मालकीच्या कंपनीने दाऊदच्या डी-गॅंगच्या लोकांशी संगनमत करून विकत घेतली, असा दावा ईडीने केला. दाऊदची बहीण हसीना पारकरचा साथीदार सलीम पटेलने मुनिराच्या कुलमुखत्यारपत्राचा गैरवापर करत तिची मालमत्ता पारकरच्या नावे केली, पारकरने ती मलिक यांना विकली, त्यामुळे मलिक यांचाही गुन्ह्यात सहभाग आहे, असेही सिंह म्हणाले.