समीर वानखेडे मुस्लिमच! नोकरी सोडावी लागेल! नवाब मलिकांचा दावा

78

एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला आपण न्यायालयात सादर केला आहे. त्यामध्ये समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. याची जेव्हा चौकशी होईल तेव्हा वानखेडे यांची नोकरी जाणार आहे, असा दावा एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

महापालिकेत नोंद  

आपण समीर वानखेडे यांच्या संबंधीचे सर्व कागदपत्रे उच्च न्यायालयाला सादर केले आहेत. शिवाय  महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक आणि मुंबई पोलिस आयुक्त यांच्याकडे सादर केली आहेत. त्यामध्ये वानखडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि जन्म दाखला आहे. त्यांचा जन्म दाखल हा मुंबई महापालिकेकडून मिळवला असून तो शिक्क्यानिशी उपलब्ध झाला आहे. महापालिकेकडे याची सविस्तर नोंद असते. जेव्हा एखादे मूल जन्माला येते तेव्हा त्याच्या आई-वडिलाच्या नावाचा उल्लेख केला जातो. पुढे त्याचा जन्म दाखला बनवताना त्यावर त्या मुलाचा धर्मही नोंदवला जातो. सध्या ही पद्धत नसली तरी १९७९ मध्ये जन्म दाखल्यात धर्माची नोंद व्हायची, त्यावेळी वानखेडे यांच्या जन्म दाखल्यावर ‘मुस्लिम धर्म’ असा उल्लेख आहे. तसेच त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हाच उल्लेख आहे. ही कागदपत्रे राज्याच्या मागासवर्ग आयोगाकडे पोलिस सादर करतील तेव्हा याची चौकशी होईल, तेव्हा समीर वानखेडे यांची नोकरी जाणार आहे, असेही नवाब मलिक म्हणाले. सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे वानखडे यांच्या कुटुंबीयांनी कागदपत्रात खाडाखोड केली आहे का, यावर आपण बोलणार नाही, पण याविषयी पत्रकार परिषद घेऊन याचा पर्दाफाश करणार असल्याचे मलिक म्हणाले.

(हेही वाचा गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका! फडणवीसांचे सरकारला पत्र)

अनिल देशमुखांची फसवणूक 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून अनिल देशमुख यांना फसवले आहे. त्यांना कारागृहात डांबण्यात आले. त्यांची निर्दोष सुटका होईलच. त्यांच्यावर आरोप करणारा माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग हा फरार आहे. कुणीही देशाची सीमा केंद्र सरकाराच्या परवानगीशिवाय ओलांडू शकत नाही, असे असताना सिंग परदेशात कसे पळून गेले? त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी परमबीर सिंग यांना भारतात आणावे, असे आवाहन मलिक यांनी केले.

वानखेडेंनी पहिल्या पत्नीला धमकावले

ज्या मुलीला समीन वानखेडेंनी घटस्फोट दिला होता ती त्यांच्या विरोधात उभी राहण्याची त्यांना भीती होती. त्यामुळे त्या मुलीच्या भावाकडे एका तस्कराकडून ड्रग्ज ठेवण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. समीर वानखेडेंनी माझ्याविरोधात तुम्ही उभे राहिलात तर संपूर्ण कुटुंबाला ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. मुलीच्या घरच्यांना घाबरवण्यात आले. पण हळूहळू सर्व बाहेर येत आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.