राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. सरकारच्या तिन्ही पक्षांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्याचे देखील पहायला मिळत आहे. काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर केलेल्या आंदोलनावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. नेत्यांच्या घराबाहेर किंवा कार्यालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नसून असे प्रकार लोकशाहीला घातक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले मलिक?
सोमवारी काँग्रेसच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. ही भूमिका योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी मांडली. कुठल्याही राजकीय पक्षाने नेत्यांच्या घराबाहेर किंवा राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नसून असा पायंडा पडणं हे लोकशाहीला घातक ठरू शकते. अशा आंदोलनांमधून पोलिस यंत्रणेवर ताण येऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे लोकशाहीत अशा आंदोलनांना मान्यता देता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक पक्षाने याबाबत विचार करुन ठोस निर्णय घेणे गरजेचे असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. यातून त्यांनी काँग्रेसची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे सूचक विधान केले आहे.
(हेही वाचाः भाजपच्या साडे तीन नेत्यांआधी शिवसेनेचा ‘हा’ नेता जाणार तुरुंगात! काय आहे आरोप?)
आज काँग्रेसच्या वतीने विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. ही भूमिका योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते मा. @nawabmalikncp यांनी मांडली. #NCP pic.twitter.com/LaGCKb5s6m
— NCP (@NCPspeaks) February 14, 2022
काँग्रेसने आंदोलन घेतले मागे
नाना पटोले यांच्या नेतृत्वात कांग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानी आंदोलन सुरू केले. त्यावेळी भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. त्याचा त्रास मुंबईकरांना झाल्याने नाना पटोले यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही हे आंदोलन मागे घेत आहोत. पण मुंबईकरांच्या या गैरसोयीसाठी भाजप नेते जबाबदार आहेत. भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांची गुंडगिरी आज समोर आली आहे, असे विधान नाना पटोले यांनी केले.
(हेही वाचाः नाना पटोले ‘नौटंकीबाज’ नेते! फडणवीसांचा हल्लाबोल)
फडणवीसांचा पटोलेंवर हल्लाबोल
काँग्रेसने आपले आंदोलन मागे घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पटोलेंवर जोरदार टीका केली. आपण सगळे असताना कोणाचीही निदर्शनं करण्याची हिंमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, उलट काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे. नाना पटोले हे नौटंकीबाज नेते आहेत. त्यांनी कितीही नौटंकी केली तरी त्याचा काहीही परिणाम नाही, अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.
Join Our WhatsApp Community