नक्षल चळवळीसाठी आता मराठा समाज लक्ष्य! 

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथील जातीय दंगलीमागे एल्गार परिषद होती. या परिषदेच्या आयोजनामागे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी)  ही नक्षलवादी संघटना होती, असे पोलिस तपासात उघड झाले. आता तिच संघटना मराठा समाजाची दिशाभूल करू लागली आहे.

नेहमी समाजातील मुख्य प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या वंचित, पीडित आणि आदिवासी समाजाला हेरून त्यांच्यामध्ये व्यवस्थेच्या विरोधात असंतोष निर्माण करणे आणि त्यांच्या हाती बंदुका देऊन देशाच्या विरोधात उभे करणे, असा अजेंडा असलेल्या नक्षलवाद्यांनी आता समाजातील मुख्य प्रवाहातील असंतुष्ट घटक असलेल्या मराठा समाजाच्या भोवती जाळे विणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्याकरता मराठा आरक्षणाचा विषय शस्त्र म्हणून नक्षलवाद्यांनी वापरला आहे. आरक्षणाच्या नावावरून तुमची फसवणूक होत आहे. तुम्ही व्यवस्था बदलण्यासाठी क्रांतीकडे वळा, आम्ही तुमची प्रतीक्षा करत आहोत, असे भडकावू आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. तसे पत्रकच प्रसिद्ध केले आहे. भारताची कम्युनिस्ट पार्टी (Communist Party of India) (माओवादी) यांनी हे पत्रक छापून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर नक्षलवाद्यांनी प्रथमच भूमिका उघड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली येथील कमलापूर गाव, अहेरी तहसीलन येथे शुक्रवारी, ११ जून रोजी रात्री ४०-५० नक्षलवाद्यांनी येऊन ही पत्रके टाकली.

(हेही वाचा : पीएफआय आणि तिच्या विभिन्न संस्था आहेत तरी कुठे? वाचा…   )

नक्षली चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन!

शिवबांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये मराठा समाजाने पुढाकार घेतला होता, पुन्हा पुढाकार घ्यायची वेळ आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मावळे बनावे लागेल. परत एकदा गनिमी काव्याचे डावपेच वापरावे लागतील. शत्रू, व्यवस्थेचे रखवाल, साम्राज्यवादाचे दलाल सत्ताधारी वर्ग आहेत. मित्र, सर्वच समाजातील गोरगरीब जनता आहे. मैदानात माओवादी शस्त्र उचलून लढत आहेत. लक्ष्य, मार्ग, साधने तयार आहेत. मराठा समाजातील शिवाजी महाराजांचा खरा आदर्श बाळगणाऱ्या मावळ्यांना आवाहन आहे की, त्यांनी रयतेचे खरे राज्य आणण्यासाठी मैदानात उतरावे. आपल्या संघटित शक्तीला क्रांतीकडे वळवा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुमची वाट पाहत आहोत,  असे भडकावू आवाहन नक्षलवाद्यांनी मराठा समाजाला केल्याने खळबळ उडाली आहे.

मराठा समाजाचे एवढे वाईट दिवस आले आहेत का? नक्षली संघटना आम्हाला सांगते आम्ही कायद्यावरचा विश्वास सोडून त्यांच्यामध्ये सामील व्हावे. आम्हाला न्याय हक्क मिळवायचा आहे. आम्हाला कायद्यावर विश्वास आहे. वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करु. न्यायालयीन लढाई लढून आणि आमचे आरक्षण किंवा पर्यायी व्यवस्था मिळवू.
– विनोद पाटील, मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते

(हेही वाचा : १५ दिवसांत १७ लाख विद्यार्थ्यांचा निकाल तयार होणार! एसएससी बोर्ड विश्वविक्रम करणार!)

एल्गार परिषदेमागे होती सीपीआय(एम)! 

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे जातीय दंगल झाली होती. त्याआधी ३१ जानेवारी रोजी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेनंतर दुसऱ्या दिवशी भीमा-कोरेगाव येथे दंगल उसळली होती, असे तपासात समोर आले. या परिषदेत गुजरातमधील तथाकथित सामाजिक कार्यकर्ता जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूमधील विद्यार्थी नेता उमर खालिद यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप झाला. याप्रकरणाच्या तपासातून या संपूर्ण प्रकरणाशी शहरी नक्षलवाद्यांचा संबंध उघड झाला. छापेमारी आणि धरपकड सुरु झाली. त्यामध्ये सुधीर ढवळे यांच्यासह ५ जणांना अटक झाली होती. त्याहीपुढे जाऊन पुणे पोलिसांनी गौतम नवलाखा, सुधा भारद्वाज, वरावरा राव, अरूण फरेरा आणि व्हर्नोन गोन्सालविस या पाच जणांना अटक केली. अटक करण्यात आलेले सारे जण हे ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सभासद असून ‘एल्गार परिषद’ ही त्यांचा देश अस्थिर करण्याच्या कटाचा भाग होता, असे पुणे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले होते. इतर संघटनांना पुढे करून ‘एल्गार परिषद’ ही केवळ त्यांचा चेहरा होती, पण प्रत्यक्षात त्यामागून हे माओवादी शहरी नक्षलवादी त्यांच्या विचारसरणीचा प्रचार करत होते. एल्गार परिषदेमध्ये आरोपी सुधीर ढवळे आणि कबीर कला मंचच्या इतर सदस्यांनी आक्षेपार्ह गाणी सादर केली. समाजामध्ये तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून पत्रके आणि पुस्तिका वितरीत केल्या, असेही पुणे पोलिसांने त्यावेळी न्यायालयात सांगितले होते. आता हेच ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) संघटना मराठा समाजाची दिशाभूल करू लागली आहे. ही आणखी एक धोक्याची घंटा आहे.

(हेही वाचा : आता पीएफआयचा देशविघातक चेहरा होतोय उघड!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here