सातत्याने वाढणारी महागाई हा मुद्दा लक्षात घेऊन पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बुधवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून महागाईविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. पुण्यातील शनिवार चौकात असणाऱ्या मारूती मंदिरासमोर इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र जमले. यावेळी त्यांनी हनुमानाची आरती आणि महागाईची अनोखी आरती देखील म्हटली. तर केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत भ्रष्टाचाराचा धिक्कार असो अशाही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आल्यात.
वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. रोजच वाढणाऱ्या इंधनाच्या दरामुळे जगायचे कसे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. केंद्र सरकारला मात्र याचे काहीच देणेघेणे नाही. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासही त्यांना कोणताही रस नाही. तर दुसरीकडे देशात फारशी महागाई नसल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. अशी वक्तव्ये म्हणजे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. या सर्वांचा निषेध म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांकडून शनिपार चौकात हे आंदोलन करण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळेंनी देखील हजेरी लावली होती. यासह राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे आणि इतर कार्यकर्ते जमले होते. यापूर्वीही राष्ट्रवादीने गुडलक चौकात २९ एप्रिल रोजी एक आंदोलन केले होते. यावेळी भोंगे लावून पंतप्रधान नरेंद्र मोंदीचे जुने भाषण देखील जनतेला ऐकवण्यात आले होते. महागाई तसेच पेट्रोल-डिझेल आणि सिलिंडर दरवाढीचा विरोध करण्यात आला होता.
Join Our WhatsApp Community