कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या वाढदिवसाचे फटाके फोडले, नंतर एकमेकांत भिडले!

88

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज 21 जुलै रोजी वाढदिवस साजरा होत आहे. अजित दादांनी 63 व्या वर्षात पदार्पण केले आहे. देशभरातून अजित पवार यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजितदादांचा वाढदिवस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी धुळे शहरातील राष्ट्रवादी भवन येथे केक कापून साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. मात्र या सेलिब्रेशननंतर दुसऱ्या क्षणाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची गटबाजी आणि अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले.

(हेही वाचा – “जिलेबी कितीही आडवळणी असली तरी…”, मिसेस फडणवीसांच्या पतीला अनोख्या शुभेच्छा)

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी आमदार अनिल गोटे समर्थक व शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले समर्थक यांच्यात धुळे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनच्या श्रेय वादावरून चांगलीच हमरातुमरी झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, राष्ट्रवादी भवन या इमारतीचे श्रमदानातून नूतनीकरण अनिल गोटे यांच्याकडून करण्यात येत आहे, त्या नूतनीकरणाच्या कार्यात शहर जिल्हाध्यक्षांना विश्वासात न घेता बऱ्याच गोष्टीत बदल करण्यात आला असल्याने शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इतकेच नाही तर त्यावर अनिल गोटे समर्थकांनी जिल्हाध्यक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या नऊ महिन्यात एकही बैठक घेतली नसल्याचा आरोप केला. यावरून एकमेकांवर आरोप करत दोघेही गट चांगलेच आक्रमक होऊन एकमेकांमध्ये भिडले. यानंतर राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी मध्यमस्थी करत दोन्ही गटांना शांततेचे आवाहन केले यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे यावेळी दिसून आले.

ncp

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.