शिवसेनेच्या बंडखोरांनी केलेल्या बंडाळीमुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रिपद आणि शिवसेनेवर सत्ता गमवण्याची नामुष्की ओढावली. मात्र अद्याप बंडखोरांविरोधात शिवसेनेने न्यायालयीन लढाई सुरू केली आहे. अशातच आता संजय राऊत यांनी शिंदे सरकार लवकरच पडेल, असा दावाही केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज्यात सत्तांतर होईल असा दावा करणाऱ्या संजय राऊत यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चांगलेच खडसावले आहे. सरकार पडणार की नाही याबाबत दावे करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्या काय आहे ते पाहा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.
(हेही वाचा – काँग्रेसचे चौधरी ‘अधीर’ झाले आणि राष्ट्रपतींचा अपमान करुन बसले, पण तरीही माफी न मागण्यावर ठाम )
काय म्हणाले अजित पवार
संजय राऊत यांनी शिंदे सरकार लवकरच पडेल आणि राज्यात सत्तांतर होईल, असा दावा केल्यानंतर अजित पवारांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, आमच्या संपर्कात कोणी आमदार नाही. त्यामुळे मी कशाला उगाच काहीतरी सांगू. आमच्या संपर्कात कोणी आल्यानंतर मी त्याबद्दल काही सांगेन. आज माझे मत आहे की, आजच्या घडीला एकमेकांची उणीदुणी काढण्यापेक्षा राज्यातील पूरपरिस्थिती गंभीर आहे तिथे मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील जनतेला मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन पुढे यायला हवे, असे ते म्हणाले.
काय केला राऊतांनी दावा
संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कुठलेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. १६ बंडखोर आमदार अपात्र ठरतील किंवा त्यांना स्वत:चा बचाव करण्यासाठी एखाद्या पक्षात विलीन व्हावे लागेल. मग ते स्वत:ला शिवसैनिक कसे म्हणवतील. अशा परिस्थितीत बंडखोरांपैकी किती आमदार हे दुसऱ्या पक्षात विलीन व्हायला तयार आहेत. त्याची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा मराहाष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं, तर आश्चर्य वाटायला नको, असा दावा संजय राऊत यांनी केला होता.
Join Our WhatsApp Community