देहू येथील पंतप्रधानांच्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू न दिल्याने राष्ट्रवादीत नाराजी दिसतेय. तसेच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपावर टीका केली आहे. यानंतर पंतप्रधानांनी माफी मागावी अशी मागणीही अजित पवारांनी केली आहे. देहूतील शिळेच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण झाले नसल्याने सत्ताधाऱ्यांनी भाजपला धारेवर धरलं. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
(हेही वाचा – Good News! लवकरच वाढणार पेन्शन आणि निवृत्तीचे वय, काय आहे सरकारची योजना?)
काय म्हणाले चंद्रकांत पाटील
राज्यातील सत्ताधाऱ्यांनी प्रत्येक विषयाला राजकारणाची किनार जोडू नये. देहूतील कार्यक्रमांमधून वाद निर्माण करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाताने इशारा करत अजित पवारांना भाषणासाठी यावं असे सांगितले होते, मात्र मी बोलणार नाही असे म्हणून अजित पवार यांनी आधिच स्पष्ट केले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या अपमानाचा विषय नाही, असे चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे.
विधान परिषदेत भाजपचा गुलाल उधळला जाणार
यामध्ये झालेल्या चर्चेसंदर्भात ते म्हणाले, विधान परिषदेत भाजपचा गुलाल उधळला जाणार आहे. भाजपमध्ये जातीचे राजकारण होत नाही. विधानपरिषदेसाठी पूर्व योजना तयार केली असून त्यावर या बैठकीत चर्चा केली आहे. देहू येथील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाल्यानंतर थेट पंतप्रधान मोदींचे नाव पुकारण्यात आले. ही बाब लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांनी स्वतः हाताने इशारा करत अजित पवारांना बोलावे असे सांगितले. पण सूत्रसंचालकांनी नावच न पुकारल्याने अजित पवारांना बोलण्याची संधी मिळाली नसल्याचे दिसून आले. यावरून राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटल्याचे पाहायला मिळत आहे.