फुटीची भीती : राष्ट्रवादीने आमदारांभोवती उभारले सुरक्षा कवच

100
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील २० ते २५ आमदार फुटून भाजपा-शिवसेनेत प्रवेश करतील, असा दावा सातत्याने सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. त्याची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांभोवती सुरक्षा कवच उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आपले आमदार सत्ताधारी पक्षातील वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची खबरदारी या माध्यमातून घेतली जाणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील आमदारांच्या मतदारसंघातील कामे थांबवली आहेत. त्यामुळे आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता आहे. त्याचा फायदा घेण्याच्या प्रयत्नात सत्ताधारी पक्ष आहेत. हा धोका टळावा, यासाठी त्यांच्या प्रस्तावित व प्रलंबित कामांचा पाठपुरावा करण्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली आहे. सरकार दरबारी अडलेली कामे सततच्या पाठपुराव्याने मार्गी लावण्याबरोबरच मंत्री आणि आमदार यांच्यातील घनिष्ठता वाढून पक्षफुटीचा धोका उद्भवू नये, यासाठीची ही दक्षता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
त्यामध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कार्यालयातील एक अनुभवी अधिकारी आणि पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील दोन व्यक्तींचा समावेश आहे. ही टीम दर आठवड्याला पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मार्गी लागलेल्या आणि अडलेल्या कामांचा अहवाल देणार आहे.

…म्हणून सावधगिरी

  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच एक दिवसीय कार्यशाळा घेतली.
  • विधिमंडळ पक्ष कार्यालयात झालेल्या या बैठकीत आमदारांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली. नवीन सरकारने आमचे अनेक प्रस्ताव रोखून धरले असून, मतदारसंघातील कामांनाही स्थगिती दिल्याने मतदारांना उत्तरे देताना कोंडी होत असल्याची तक्रार अनेक आमदारांनी केली.
  • त्यामुळे आमदारांची मनस्थिती बदलण्यासह सत्ताधाऱ्यांची रणनीती  हाणून पाडण्यासाठी राष्ट्रवादीने पक्षपातळीवर स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.