उद्धव ठाकरे यांचे मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल त्याऐवजी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांना एकत्रित खंजीर हे चिन्ह द्यायला हवे होते, असा खोचक टोला भाजपचे विधानपरिषदचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीसोबत जाणारे संपतात, हा इतिहास आहे. शिवसेनेच्या बाबतीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले स्वप्न पूर्ण करुन दाखवले, असा आरोप पडळकर यांनी केला आहे. निवडणूक आयोग कोणताही दुजाभाव करत नाही. उलट शिवसेना- राष्ट्रवादीला एकत्र करुन आयोगाने खंजीर हे चिन्ह द्यायला हवे होते, अशी खोचक टीकाही पडळकर यांनी केली. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.
( हेही वाचा: मशाल चिन्हावरुन समता पार्टी आक्रमक; निवडणूक आयोगाला विचारले ‘हे’ तीन प्रश्न )
पवारांच्या दुखण्याचे हेच मूळ आहे
पडळकर पुढे म्हणाले की, राष्ट्रवादीचा जन्मच खंजीरातून झाला आहे. राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून या दोघांना खंजीर चिन्ह द्यायला हवे होते. तसेच पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 2019 मध्ये केलेल्या बंडावरही भाष्य केले आहे. अजित पवार यांनी केलेले बंड फसले. बंडानंतर अवघे दोन आमदार त्यांच्यासोबत राहिले. याउलट हिंदुत्वाच्या मुद्यावर बंड करणा-या एकनाथ शिंदे यांच्यासोबत 50 आमदार गेले. त्यामुळे सरस कोण हा संदेश जनतेत गेला. भाजपने मन मोठे करत मराठा समाजाचा मुख्यमंत्री केला. फसलेले बंड आणि मराठा समाजाचा मुख्यमंत्री, हेच पवार यांच्या दुखण्याचे मूळ आहे, अशी टीका पडळकर यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community