केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. त्याविरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. याविषयी माध्यमांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारले असता त्यांनी या प्रकरणात मी पडणार नाही, एकदाच सांगतो, अशा शब्दांत थेट प्रतिक्रिया दिल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. कालपर्यंत शिवसेना पाठिंबा देत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे शरद पवार आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या अडचणीच्या परिस्थिती प्रतिक्रिया देणेही टाळत आहे, हे पाहून राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरु झाले आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीकाही करत आहेत. यातच शिंदे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेत कॅव्हेट दाखल केला आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, सध्या धनुष्यबाणाचा जो वाद सुरू आहे. त्यात मी पडणार नाही, हे मी एकदाच सांगतो, असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तत्पूर्वी, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना, एकदा निकाल दिल्यानंतर त्यावर चर्चा होत नसते. त्यामुळे नवे पक्ष नाव आणि चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जायचे असते. लोक फार तर १५ दिवस महिनाभर चर्चा करतात आणि त्यानंतर नवे निवडणूक चिन्ह स्विकारतात. इंदिरा गांधी आणि त्यावेळच्या पक्षातील नेत्यांशी वाद झाला. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या चिन्हावर आणि नावावर दावा केला. मात्र आयोगाने त्यांना त्यावेळचे काँग्रेसचे चिन्ह दिले नाही. त्यामुळे त्यांनी हात हे चिन्ह स्विकारले आणि निवडणुकीला सामोरे गेले, असे शरद पवार म्हणाले होते.
Join Our WhatsApp Community