एनसीबीची कारवाई दिखाऊपणाची! शरद पवारांचा आरोप

जबाबदार अधिकारी बेछुटपणे आरोप करतो हे राज्यात पहिल्यांदाच घडत आहे. देशमुखांनी जबाबदारी ओळखून राजीनामा दिला. ते बाजूला झाले आणि हे गृहस्थ गायब झाले, अशी टीका शरद पवार यांनी परमबीर सिंग यांचे नाव न घेता केली.

अमली पदार्थांच्या विरोधी कारवाईत केंद्राची आणि राज्याचीही एजन्सी कार्यरत आहे. परंतु केंद्राकडून जी कारवाई होते, त्यांच्याकडून जेवढा माल पकडला जातो, त्या तुलनेत राज्याच्या एजन्सीने पकडलेला माल जास्त आहे, मात्र राज्याची एजन्सी त्याचा गवगवा करत नाही. त्यामुळे केंद्राची एजन्सी ही दिखाऊपणासाठी कारवाई करते का?, असा प्रश्न उपस्थित करत क्रुझवरील कारवाईत के.पी. गोसावी हा होता, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. कारवाई वेळी तो पंच होता, आता तो फरार का आहे? याचा अर्थ असा आहे की, केंद्राच्या एजन्सी अशा व्यक्तींशी संबंधित आहेत, हेही चुकीचे आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

अनिल देशमुखांवर आरोप करणारा फरार का?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या कथित शंभर कोटी वसुली प्रकरणाचा तपास करत असताना सीबीआयने तब्बल पाचव्यांदा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापा टाकला. विशेष म्हणजे पैशांच्या अफरातफर प्रकरणी ईडीकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु आहे. तपास यंत्रणेकडून सुरु असलेल्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. सगळ्या तपास यंत्रणांचा वापर राजकीय दृष्टीने केला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांबद्दल त्यावेळच्या मुंबई पोलिस आयुक्तांनी आरोप केले होते. त्याबाबत मलाही त्यांनी माहिती दिली होती. त्यांच्या आरोपामुळे वातावरण तयार झाले. त्यामुळे देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. आरोप करणारे कुठे आहेत त्याचा आज पत्ता नाही. जबाबदार अधिकारी बेछुटपणे आरोप करतो हे राज्यात पहिल्यांदाच घडत आहे. देशमुखांनी जबाबदारी ओळखून राजीनामा दिला. ते बाजूला झाले आणि हे गृहस्थ गायब झाले. हा फरक आहे, असे शरद पवार म्हणाले. आता अनिल देशमुख यांची चौकशी करण्याचे काम सुरु आहे. काल त्यांच्या घरी पाचव्यांदा छापा टाकला. मला कौतुक वाटते त्या एजन्सीचे. पाच वेळा एकाच घरात चौकशी करणे किती योग्य याचा विचार जनतेनेच करायला हवा, अशा शब्दात पवारांनी निशाणा साधला.

(हेही वाचा : मावळमधील गोळीबाराला पोलिस जबाबदार! पवारांनी केला आता खुलासा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here