शरद पवारांचा नवा सूर… म्हणाले केंद्राचे महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य!

160

राज्यात सध्या लसीकरणावरुन केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असा सामना रंगला आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारही आपल्याला सहकार्य करत असल्याचे म्हटल्याने, शरद पवारांचा हा नवा सूर आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती दिली होती. केंद्राकडून गरज आहे तितक्या वेगाने लसींचा पुरवठा होत नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. कोरोना आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी, काही राज्ये लसींचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र आता शरद पवार यांनीच केंद्र सरकार सहकार्य करत असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले पवार?

कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. केंद्र सरकारही आपल्याला सहकार्य करत आहे. मी कालच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. राज्यातील आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर आम्ही चर्चा केली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य खाते महाराष्ट्राच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले, असे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राचे प्रयत्न आणि केंद्राची मदत या दोहोंच्या सहाय्याने आपण या संकटातून बाहेर पडू, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः ब्रेक दि चेन संदर्भात राज्य शासनाच्या नव्या स्पष्ट सूचना! कसे आहेत नियम?)

साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध

शरद पवार यांनी गुरुवारी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राज्यातील कोरोनाची आकडेवारी वाचून दाखवत परिस्थिती किती गंभीर आहे, याची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती चिंताजनक असून, कोरोनाचे हे संकट परतावून लावण्यासाठी, राज्यातील आरोग्य यंत्रणा अहोरात्र कष्ट घेत आहे. मात्र, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कठोर निर्बंध लागू करावे लागत असल्याचे, पवार म्हणाले.

मागील वर्षीच्या तुलनेत सध्याची परिस्थिती बिकट

नव्या निर्बंधांसंदर्भात दुकानदार, व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याचा उल्लेख पवारांनी केला. तसेच नाशवंत भाजीपाल्याचे काय करायचे, असा प्रश्न शेतकरी आणि व्यापारी वर्गापुढे आहे याचीही जाणीव आपल्याला असल्याचे पवारांनी म्हटले आहे. मात्र सध्या घेतलेला निर्णय आणि निवडलेला मार्ग हा यशाचा मार्ग करायचा असेल, तर या परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याशिवाय आपल्याकडे पर्याय उपलब्ध राहिलेला नाही. वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही, याची जाणीव सामाजातील सर्व घटकांनी ठेवणे गरजेचे आहे. राज्य सरकारकडून जनतेच्या हितासाठी नाइलाजास्तव काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागले आहेत, असे पवारांनी स्पष्ट केले. मागील वर्षी आपण करोनाला उत्तम प्रकारे तोंड दिले. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत आताची संख्या पाहिल्यास सध्याच्या रुग्ण वाढीचा वेग अत्यंत चिंताजनक आहे, असं शरद पवारांनी म्हटले आहे. करोना किती प्रमाणात वाढतोय हे सांगताना पवारांनी काही आकडेवारीही सादर केली.

(हेही वाचाः केंद्रामुळे लसीकरण मोहिमेचा बट्ट्याबोळ! अनंत गाडगीळांचा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.