मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पश्चिम उपनगरातील नाल्यांची पाहणी करून ७२ टक्के सफाईचे काम केल्याचा दावा केला. परंतु महापौरांनी दावा केलेली ही आकडेवारी केवळ कागदावरीलच असून प्रत्यक्षात नाल्यांची सफाई योग्यप्रकारे होतच नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कप्तान मलिक यांनी केला आहे.
(हेही वाचा : ड्रीम मॉलचा चौकशी अहवाल सभागृह नेत्यांना, पण स्थायी समितीला नाही!)
मोठ्या नाल्यांची सफाई केवळ फार्स!
मुंबईतील मोठ्या नाल्यांची सफाई होतच नसून केवळ सफाईचा फार्स असल्याचे मलिक यांचे म्हणणे आहे. नाल्याची सफाई कुठे झाली हे महापौरांनी मला दाखवावे नाही तर कुठे सफाई झाली नाही, हे मी त्यांना दाखवून देतो, असे आव्हान त्यांनी दिले. त्यामुळे महापौरांनी माझ्यासोबत हवी तर पाहणी करावी, असेही आव्हान त्यांनी दिले आहे. ते कुठून गाळ काढतात आणि कुठे टाकतात याची तरी महापौरांनी पाहणी केली आहे का, असा सवाल करत मोठ्या नाल्यांसह मिठी नदीची पाहणी करून नालेसफाईची झाल्याचा दावा हा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप करत मलिक यांनी सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. नाल्याच्या शेजारी पोकलेन मशीन बसवून त्यातून नाल्याच्या कडेला असलेला गाळ काढला जातो. पण प्रत्यक्षात ती योग्यप्रकारे सफाई होत नाही. शिवाय नाल्यात माती टाकून तो गाळ म्हणून दाखवला जाण्याची जुनी पध्दत आजही ‘जैसे थे’च आहे. पण प्रशासनातील अधिकाऱ्यांचे याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.
Join Our WhatsApp Community