एकीकडे शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आपली पकड मजबूत करण्यासाठी पाऊले उचलली असताना दुसरीकडे आता विरोधीपक्ष म्हणून समोर उभ्या ठाकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कल्याण-डोंबिवलीत नवसंजीवनी देणारे जगन्नाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांच्याकडे त्यांनी कल्याण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे यांनी आजारपणामुळे पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले असून यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि खंदे समर्थक म्हणून जगन्नाथ शिंदे ओळखले जातात. माहितीनुसार दोन दिवसांपूर्वीच शिंदे यांनी राजीनामा दिल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान पक्ष बांधणीसाठी आणि मजबुतीसाठी जगन्नाथ शिंदे यांना जिल्हाध्यक्ष पद दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला होता. मात्र शिंदेंच्या राजीनाम्याने पक्षाला उभारी कशी मिळेल? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष पद सांभाळले होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले आहे. मात्र शिंदे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याने आता पक्ष श्रेष्ठी जिल्हाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळ्यात टाकणार? हे येत्या काळात समजेल.
(हेही वाचा – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मनसेचा थेट २२ मार्चला सिनेमा; राज ठाकरेंची माहिती)
Join Our WhatsApp Community