मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणल्याचे श्रेय मुख्यमंत्री आणि मुंबईच्या महापौर आपल्या पदरी पाडून घेत असतानाच, मुंबईत आम्हीही आहोत असे राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंगळवारी दाखवून दिले. शिवसेना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विक्रोळीत उभारल्या गेलेल्या भारतातील पहिल्या तृतीय पंथीयांसह समलैंगिक समुदायातील नागरिकांसाठी कोविड-१९ लसीकरण केंद्राचे लोकार्पण केले.
श्रेयातील वाटेक-यांना राष्ट्रवादीने दूर ठेवले
एरव्ही कोविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन तथा लोकार्पण करणारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर यांना कुठलीही कल्पना न देता, राष्ट्रवादी काँग्रेसने हा कार्यक्रम आटोपून घेत भविष्यात युतीची स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. मुंबईत झालेल्या लसीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात प्रथमच टोपे यांनी हजेरी लावली. ही हजेरी लावताना महापौर, महापालिका सार्वजनिक आरोग्य समितीच्या अध्यक्ष उपस्थित राहणार नाही याची काळजी घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रेयातील वाटेकऱ्यांना दूर ठेवले.
(हेही वाचाः शिवसेना राणेंच्या विरोधात रस्त्यावर, भाजपने उरकले गिरगाव चौपाटीवरील प्रसाधनगृहाचे लोकार्पण)
तृतीय पंथीयांसाठी भारतातील पहिले लसीकरण केंद्र
मुंबई महापालिका एन-प्रभागच्या सहकार्याने सेंट जोसेफ शाळा विक्रोळी (पश्चिम) येथे तृतीय पंथीयांसह समलैंगिक समुदायातील नागरिकांसाठी विशेष कोविड-१९ प्रतिबंधक मोफत लसीकरण केंद्राचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले. हे लसीकरण केंद्र हे तृतीयपंथी व समलैंगिक समुदायाला समर्पित केलेले भारतातील पहिले मोफत लसीकरण केंद्र आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीची संभाव्य युती
शिवसेना पक्ष राणेंच्या विरोधात आंदोलन करत राहिला आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह देशातील पहिल्या तृतीयपंथी व समलैंगिक समुदायाकरता उभारलेल्या कोविड लसीकरण केंद्राचे लोकार्पण पार पाडले. राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. तर आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची संभाव्य युती मानली जाते.
(हेही वाचाः वरुण सरदेसाईंना सरकारी भाचा घोषित केले आहे का? मनसेचा सरकारला सवाल)
राष्ट्रवादीचे अस्तित्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न
महाविकास आघाडीमुळे घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी आपल्या विभागातील कोविड केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करुन घेतले होते. पण मुंबईतील प्रत्येक कोविड केंद्र आणि लसीकरण केंद्राचे श्रेय सत्ताधारी पक्ष आपल्या झोळीत टाकून घेत असल्याने, आता खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मैदानात उतरवत राष्ट्रवादी काँग्रेसने आपले मुंबईतील अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेविका ज्योती हारुन खान, एन प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव, माजी गटनेते धनंजय पिसाळ, परिमंडळ ६ चे उपायुक्त देवीदास क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, ‘एन’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय सोनावणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप, एन विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र खांदाडे, एलजीबीटी बिगर शासकीय संस्थेच्या प्रिया पाटील, सलमा खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचाः शिवसेनेच्या आंदोलनामुळे राज्याला झाले ‘हे’ फायदे… मनसेने दिली यादी)
Join Our WhatsApp Community