NCP : अजित पवार गटाच्या आमदारांवर जयंत पाटील यांचे मौन

201
NCP : अजित पवार गटाच्या आमदारांवर जयंत पाटील यांचे मौन

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी जे उमेदवार दिले त्यात डॉ. अमोल कोल्हे सोडले तर उर्वरित सर्व खासदार हे पहिल्यांदा लोकसभेत जाणार आहेत. त्यामुळे लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गुरुवारी (६ जून) दिली. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेत राज्य सरकारच्या विरोधात रोष दिला. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (NCP)

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक प्रदेश कार्यालयात पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह डॉ. अमोल कोल्हे, अमर काळे, बजरंग सोनावणे, बाळ्यामामा म्हात्रे, धैर्यशील मोहिते-पाटील, भास्कर भगरे, उपस्थित होते. सुप्रिया सुळे आणि निलेश लंके हे नियोजित कार्यक्रम असल्याने येऊ शकले नाहीत. या बैकठीनंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे स्पष्ट संकेत दिले. (NCP)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : भाजपाला कुठे झाले नुकसान आणि कुठे झाला फायदा?)

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे अजित पवार गटात अस्वस्थता आहे. त्यातून अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार पुन्हा शरद पवार गटात परतणार असल्याची चर्चा आहे. पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे १८ ते १९ आमदार संपर्कात असल्याचे म्हटले आहे. याविषयी जयंत पाटील (Jayant Patil) यांना विचारले असता त्यांनी या प्रश्नावर बोलण्याचे टाळले. काही आमदार रोहित पवार यांच्या संपर्कात असतील. मात्र, मी या विषयावर योग्यवेळी बोलेन. आमचे आमदार तिकडे गेले तरी लोकसभा निवडणुकीत लोकांचा कल आमच्या बाजूने आहे. आमदार गेल्यामुळे आमचा पक्ष स्वच्छ झाला आहे. त्यामुळे परत येऊ इच्छीणाऱ्या आमदारांबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असे जयंत पाटील म्हणाले. (NCP)

लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हामुळे पक्षाला फटका बसल्याचे पाटील (Jayant Patil) यांनी यावेळी सांगितले. पिपाणी चिन्हाला सरासरी ४५ ते ५० हजार मतदान झाले आहे. एकट्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पिपाणी चिन्हाला १ लाख ३ हजार मते मिळाली. तर सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा आम्ही ३२ हजार मतांनी गमावली. सातारा मतदारसंघात पिपाणी चिन्हाला ३७ हजार मते मिळाली आहेत. पिपाणीचा प्रचार तुतारी असा केला गेल्याने आम्हाला फटका बसला. त्यामुळे पिपाणी चिन्हाविषयी निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. (NCP)

अहमदनगरमध्ये वर्धापनदिन

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय विस्तारित कार्यकारिणीची बैठक येत्या ९ जून रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे. तर १० जून हा पक्षाचा स्थापना दिन यावर्षी अहमदनगर शहरात साजरा केला जाणार आहे. वर्धानपदिनाच्या निमित्ताने अहमदनगर शहरात पक्षाची सभा जाहीरसभा होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी यावेळी दिली. (NCP)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.