माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड पुन्हा अडचणीत आले असल्याचे दिसत आहे. गेल्या आठवड्याभरात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून, यावेळी एका महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या विनयभंगाचे प्रकरण
रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणा-या तिस-या कळवा खाडी पुलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह पीडित महिलेसह अन्य नेते उपस्थित होते. संध्याकाळी नवीन उड्डाणपुलाच्या उद्धाटन समारंभात ही घटना घडल्याचा दावा एका 40 वर्षीय महिला सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.
( हेही वाचा: मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट )
या महिलेचा दावा आहे की, आव्हाड यांनी महिलेला चुकीच्या पद्धतीने शरीराला स्पर्श करत तिला बाजूला होण्यास सांगितले. त्यानंतर महिलेने स्थानिक पोलीस अधिका-यांकडे संपर्क साधला. यावेळी त्यांनी तिला तक्रार दाखल करण्याचे सुचवले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस पुढील तपास करत आहेत.
वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, ठाण्यातील विवियाना माॅलमध्ये हर हर महादेव हा मराठी चित्रपट पाहणा-या प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाणे वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आव्हाड यांच्यावर प्राणघातक हल्ला आणि भादंविच्या इतर कलमांनुसार गुन्हा दाखल केला होता. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित तथ्यांचा विपर्यास करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. अटकेनंकर दुस-याच दिवशी न्यायालयाने आव्हाड यांना हजार रुपयांच्या जामीनावर जामीन मंजूर केला होता.