Chhagan Bhujbal शिवसेना उबाठाच्या वाटेवर की वेगळी चूल?

215
Chhagan Bhujbal शिवसेना उबाठाच्या वाटेवर की वेगळी चूल?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे पक्षात नाराज असून काही दिवसांतच वेगळा विचार आणि कृती करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ते एकतर अजित पवार यांची साथ सोडून उद्धव ठाकरेंशी हातमिळवणी करण्याची शक्यता आहे अन्यथा राष्ट्रीय राज्य सभा खासदारकी घेऊन ‘ओबीसी कार्ड’ देशपातळीवर खेळण्याच्या विचारात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. पक्षातून बाजूला करण्यात आल्याने आणि संसदेचे तिकीट नाकारल्याने नाराज झालेले भुजबळ पूर्वीचे मतभेद असतानाही उद्धवच्या नेतृत्वाखालील सेनेत जाण्याचा विचार करत आहेत. (Chhagan Bhujbal)

राष्ट्रीय पातळीवर ओबीसी नेते म्हणून काम करण्याची इच्छा

ओबीसी समाजासाठी काम करणाऱ्या समता परिषद या सामाजिक संस्थेचे प्रमुख भुजबळ यांनी १७ जूनला त्यांच्या समर्थकांची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. देशभरात ओबीसी लोकसंख्या नेमकी किती आहे हे जाणून घेण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशव्यापी जातगणना करण्याची विनंती करणार असल्याचे भुजबळ यांनी सोमवारी सांगितले. व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर असलेले, राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य आणि नव्याने उदयास आलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाला विरोध म्हणून अंतरवाली सराटी गावात जाऊन उपोषण सुरू केले. या उपोषणाला भुजबळ यांनी पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. जरांगे यांच्या भूमिकेलाही भुजबळ यांनी तीव्र विरोध केला होता तसेच मराठा आरक्षण देण्याबाबत सरकारमध्ये मतभेद झाल्याने भुजबळ यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे भुजबळ यांचा कल संधी मिळेल त्या पक्षाकडून राज्यसभेवर खासदारकी घेऊन, राष्ट्रीय पातळीवर ओबीसी नेते म्हणून काम करण्याची इच्छा असल्याचे समजते. (Chhagan Bhujbal)

ना लोकसभा, ना राज्यसभा

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिकची जागा भुजबळ यांच्या पुतण्याला देण्यास भाजपाने नकार दिला आणि अखेर त्या जागेवर शिवसेना (शिंदे) उमेदवाराने निवडणूक लढवली. भुजबळ यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती मात्र पक्षाने अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा या बारामतीतून पराभूत झाल्या. (Chhagan Bhujbal)

(हेही वाचा – Market Department : अनधिकृत शेळ्या, मेंढ्या पकडण्यावरच तीन वर्षांत पावणे दोन कोटींचा खर्च)

ठाकरे यांची पाठराखण

भुजबळ यांनी गेल्या काही दिवसांत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका केली नाही. उलट महायुतीच्या विरोधात भूमिका घेत ठाकरे यांची पाठराखण केल्याची काही उदाहरणे आहेत. त्यामुळे भुजबळ यांचा कल शिवसेना उबाठाकडे अधिक असल्याचे सूत्रांनी सांगितले. भुजबळ यांनी एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली असली तरी त्या घटना विसरून भुजबळ यांचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठात स्वागतच होईल, अशी शक्यता नाकारता येत नाही. (Chhagan Bhujbal)

पावसाळी अधिवेशनानंतर ‘राष्ट्रवादी’त भूकंप?

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील १७-१८ आमदार संपर्कात असून पावसाळी अधिवेशनानंतर शरद पवार यांच्या पक्षात सामील होतील, असा दावा केला. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विकास निधीचे वाटप झाल्यानंतर ‘ते’ आमदार शरद पवार यांच्या पक्षात येतील, असेही रोहित यांनी सांगितले. (Chhagan Bhujbal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.