राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. यामध्ये काही वेळा मिश्कील टिप्पणी होत असल्याचे देखील पहायला मिळत आहे. असाच गंमतीदार वाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात पहायला मिळत आहे.
एकटे फडणवीस सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कसे काय सांभाळणार, असे विधान अजित पवार यांनी केले होते. त्यावरुन मी अजित पवारांना गुरुमंत्र देईन असे उत्तर फडणवीस यांनी दिले होते. त्यांच्या याच उपरोधिक टीकेची अजित पवार यांनी परतफेड केली आहे.
मी त्यांना पत्र पाठवतो
मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तुमच्याकडे ट्रेनिंग घ्यायला कधी येऊ याबाबत विचारणार आहे. तसेच या ट्रेनिंगला फी लागणार आहे की मोफत होणार आहे, ते पण मी विचारणार आहे. त्याप्रमाणे फडणवीसांशी हितगूज करुन माझ्या ज्ञानात भर घालतो, असे मिश्कील उत्तर अजित पवार यांनी फडणवीसांना दिले आहे.
(हेही वाचाः ‘उद्या त्यांचं सरकार आलं तर मी त्यांना गुरुमंत्र देईन’, फडणवीसांचं पवारांना प्रत्युत्तर)
काय म्हणाले होते फडणवीस?
येत्या काळात कधी त्यांचं राज्य आलंच आणि त्यांच्याकडे दोन-तीन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी आली तर ती कशी पार पाडायची याचा गुरुमंत्र मी अजित पवार यांना नक्की देईन. मात्र नियोजन मंत्री म्हणून हे जिल्हे माझ्याकडे आहेत. आणि मी संपूर्ण महाराष्ट्र सांभाळला आहे, मग सहा जिल्ह्यांचं काय घेऊन बसलात, असा सवाल करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला होता.
अजित दादांचे विधान
माझ्याकडे केवळ एका पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद होतं तेव्हा तो एक जिल्हा सांभाळताना माझ्या नाकीनऊ येत होते, आता फडणवीसांकडे सहा जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद असून ते या सर्व जिल्ह्यांचा कारभार कसा सांभाळणार, असा खोचक सवाल अजित पवार यांनी फडणवीसांना केला होता.
Join Our WhatsApp Community