राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात ही नाराजी उघड झाल्याचे बोलले जात होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनावेळी दिल्लीत झालेल्या सभेत अजित पवार हे भाषण न करताच मंचावरुन उठून गेल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. पण याबाबत आता स्वतः अजित पवार यांनी खुलासा केला आहे. नाराजीच्या बातम्यांना काहीही अर्थ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
…म्हणून मी भाषण केले नाही
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून जयंत पाटील यांनी प्रतिनिधित्व केले. मला या सभेमध्ये भाषण करण्याची संधी देण्यात आली होती. पण मी राष्ट्रीय पातळीवर जास्त भाष्य करत नाही. तसेच या सभेदरम्यान वेळेच्या अभावामुळे मला भाषण करणे शक्य नव्हते. माझ्यासह सुनिल तटकरे, वंदना चव्हाण यांच्यासह आणखी 5 ते 6 जणांना भाषण करता आले नाही.
(हेही वाचाः राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? कार्यकारिणीच्या बैठकीतून शरद पवारांसमोरच अजित पवार निघून गेले)
कारण शरद पवार यांचे तीन वाजता समारोपाचे भाषण होणार होते. म्हणून आम्ही भाषण केले नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले नाही. त्यामुळे या नाराजीच्या बातम्यांमध्ये कुठलेही तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
मी नाराज का होऊ?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मला कधीही डावलण्यात आलं नाही. या पक्षाने मला उपमुख्यमंत्रीपद दिले,राज्याचा विरोधी पक्षनेता केले, मग मी नाराज होण्याचे कारण काय?, असा सवाल अजित पवार यांनी यावेळी केला. त्यामुळे वस्तुस्थितीवर आधारित बातम्या माध्यमांनी द्याव्यात, असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community