पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते आणि राज ठाकरेंचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. तर गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हाकालपट्टी करण्यात आली. त्यानंतरही मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असताना वसंत मोरे मनसे सोडणार का?, अशी चर्चा सुरू होती. त्यात आता थेट राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानेच वसंत मोरेंना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर दिल्याने तर्क-वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे तात्या अर्थात वसंत मोरे कोणता निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
(हेही वाचा – वसंत मोरेंच्या ‘या’ खंद्या शिलेदारासह 400 कार्यकर्त्यांची ‘मनसे’ला सोडचिठ्ठी)
वसंत मोरे यांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. अजितदादांच्या या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे. एका विवाह सोहळ्यात वसंत मोरे आणि अजित पवार या दोघांनीही हजेरी लावली होती. त्यावेळी हे दोन्ही नेते आमने-सामने आले होते. या भेटीवेळी अजित पवारांनी मोरेंना थेट राष्ट्रवादीत येण्यासाठी खुली ऑफर दिली. तात्या कधी येताय… वाट पाहतोय… असे अजितदादा म्हणाले. अजित पवारांच्या वक्तव्याला वसंत मोरे यांनीही दुजोरा दिला आहे.
दरम्यान, आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिल्यामुळे मनसेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अचानक आलेल्या या ऑफरमुळे वसंत मोरेही क्लिनबोल्ड झाले. त्यांना काय बोलावे काहीच सूचेना. त्यांनीही नुसतंच स्मितहास्य करून हा विषय टाळला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यासंदर्भात बोलताना मनसे सोडणार नसल्याचे देखील वसंत मोरे यांनी स्पष्ट केले आहे.