हिंदुस्थान पोस्टच्या बातमीवर शिक्कामोर्तब! दिलीप वळसे-पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

देशमुखांच्या जागी दिलीप वळसे-पाटील हे गृहमंत्री होणार असल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने २१ मार्च रोजीच दिले होते. त्यामुळे या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. 

135

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात एकच वादळ उठले. अखेर सोमवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याने आता हे वादळ अंशतः का होईना, पण शांत झाले आहे. त्यांच्या जागी आता गृहमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे. देशमुखांच्या जागी दिलीप वळसे-पाटील हे गृहमंत्री होणार असल्याचे वृत्त हिंदुस्थान पोस्टने २१ मार्च रोजीच दिले होते. त्यामुळे या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

(हेही वाचाः देशमुखांची विकेट पडणार, दिलीप वळसे-पाटील गृहमंत्री होणार?)

राज्यपालांकडून अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या शिफारसीनुसार, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनिल देशमुख यांचा राजीनामा मंजूर केला आहे. गृह विभागाचा कार्यभार आता दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या पदासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची नावे शर्यतीत होती.

(हेही वाचाः अखेर अनिल देशमुख यांनी दिला राजीनामा!)

हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सध्या असलेल्या कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्यास देखील राज्यपालांनी मान्यता दिली आहे.

वळसे-पाटील शांत, संयमी! 

गृहमंत्रीपदासाठी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाचा विचार सुरू असून, दिल्लीत सध्या यासाठी बैठक सुरू आहे. दिलीप वळसे-पाटील हे आपल्या शांत, संयमी आणि अभ्यासू वृत्तीसाठी ओळखले जातात. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली होती. दिलेली जबाबदारी चोखपणे बचावणे आणि वादापासून दूर राहणे ही वळसे-पाटील यांची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून जोरदार टीका होत असतानाच दिलीप वळसे-पाटील यांच्या खांद्यावरच गृहमंत्रीपदाची जबाबदारी देण्याचा विचार शरद पवार आणि पक्षाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.