भाजपा शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार असल्याचे सांगत आहे. परंतु, निवडणुकीला आणखी एक वर्ष असून, विधानसभेच्या सर्व २८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी केली.
मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील म्हणाले, येत्या निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीच्या समोर फक्त एकटा भाजप असेल, शिंदे गट तोपर्यंत टिकेल असे मला वाटत नाही. भाजपला स्थानिक पक्ष, राज्य स्तरावरील पक्ष, त्यांचे अस्तित्व मान्य नाही. भाजपला असं वाटतंय की आपली मते हे पक्ष खाणार आहेत. त्यामुळे स्थानिक पक्षांना संपवण्याचे काम अव्याहतपणे प्रत्येक राज्यात भाजपने केले आहे. त्यांचा मित्र असो वा शत्रू असो, त्यांना फोडणे त्यांच्यावर वेगवेगळ्या कारवाया करणे आणि त्यांना नामोहरम करुन त्यांच्या मागे जाणारी मतं आपल्या मागे वळवणे, हा त्यांचा एककलमी कार्यक्रम असतो असेही जयंत पाटील म्हणाले.
( हेही वाचा: ‘2024 ला आमदार होऊन दाखवं’; रामदास कदम यांचे भास्कर जाधव यांना खुले आव्हान )
शिंदेंना केवळ ५ ते ६ जागा मिळतील
शिंदे गट राहणार की नाही हा प्रश्न लोकांच्या मनात आहेच आणि यदाकदाचित राहिला तर भाजप सर्व्हे करेल आणि जाहीर केलेल्या ४८ जागांपैकी एकनाथ शिंदे यांना सांगतील तुमच्या ५-६ जागा निवडून येणार आहे. त्यामुळे उरलेल्या ठिकाणी आम्ही वेगळा पर्याय देतो. अशी परिस्थिती शेवटच्या क्षणी निर्माण होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.