जयंत पाटील कर्नाटकाला विश्वासात घेतील का?

महारष्ट्रासाठी कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाच्या पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करावे, हा चमत्कार जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्या सोबतच्या बैठकीत घडवून आणतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  

92

पाऊस आला कि कोल्हापूर, सांगली हे दोन जिल्हे महापुरामुळे वेढले जातात. याकरता २००५ सालीच्या महापुराचा दाखला दिला जातो, कारण त्या वर्षी अलमट्टी धरण बांधून पूर्ण झाले होते, म्हणून ही परिस्थिती उद्भवली, असे कारण दिले जात होते,  मात्र त्यावेळी झालेल्या अतिवृष्टीने राज्यात सर्वत्र महापूर आला होता. त्या वर्षीच्या महापुरासाठी अलमट्टी धरण कारण नव्हते, हे एक वेळ मान्य केले, तरी २०१९ साली कोल्ह्यपूर, सांगलीमध्ये आलेल्या महापूराला काय कारण होते?  कर्नाटकातील अल्लमट्टी धरणाच्या बॅक वॉटरने हे दोन जिल्हे पाण्याखाली आले होते. हे स्पष्टपणे दिसून आले होते. यंदाही देशात दमदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसात हे दोन्ही जिल्हे पाण्याबाहेर दिसावेत, याकरता राज्य सरकारने आतापासून तयारी सुरु केली आहे. यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील शनिवारी, १९ जून रोजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. ही चर्चा किती सकारात्मक होणार, हे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत दिसून येणार आहे.

कोयनापेक्षा अधिक क्षमतेचे अलमट्टी धरण! 

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यापासून २३५ किमी अंतरावर अलमट्टी धरणाचे बॅक वॉटर लागते. अलमट्टी धरणाच्या भिंतीची लांबी १,५६५ मीटर आणि उंची ५२४ मीटर आहे. धरणात ५२४ मीटरपर्यंत पाणी असल्यास तो साठा २०० टीएमसी आणि ५१९ मीटरपर्यंत पाणी भरल्यास तो साठा १२३ टीएमसी होतो. तुलनेने कोयना धरणाची क्षमता ११० टीएमसी इतकी आहे. धरणाची उंची आणखी पाच मीटरने वाढवण्याचे प्रयत्न कर्नाटक सरकारकडून सुरू आहेत. मात्र, उंची वाढवल्याने याचा मोठा फटका सांगलीपर्यंतच्या गावांना बसू शकतो. त्यावर महाराष्ट्राचा आक्षेप आहे. याशिवाय पावसाळ्यात गंभीर पूरस्थिती उद्भवू शकते, असा काही तज्ज्ञांचा दावा आहे. याच कारणांमुळे महाराष्ट्र सरकारने अलमट्टीच्या उंचीला विरोध केला आहे. सर्वोच्च  न्यायालयानेही उंची वाढवण्यास परवानगी दिलेली नाही.

(हेही वाचा : पुढचा आठवडा मुंबईकरांसाठी धोक्याचा… काय आहे कारण?)

जयंत पाटील चमत्कार घडवून आणतील का? 

  • पावसाळ्यात या धरणाच्या पाण्याचा विसर्ग नियोजनबद्धपणे केला तर त्याचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना फटका बसणार नाही. मात्र हा विसर्ग त्या त्या वेळी न करता पाणी साठवून ठेवल्यास धरणाचे बॅक वॉटर सांगली, कोल्हापुरात शिरते.
  • हे पाणी महाराष्ट्रात शिरावे, हा कर्नाटकाचा राजकारणाचा भाग आहे, अशी टीका अधूनमधून होत असते. या राजकारणाला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाची झालर आहे, असेही बोलले जाते.
  • शिवाय यंदा महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार आहे, तर कर्नाटकात भाजपचे सरकार आहे. यंदाच्या पावसाळ्यात कर्नाटकाकडून हे राजकारण होऊ नये, म्हणून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आवर्जून कर्नाटकात जाऊन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्याशी चर्चा करणार आहेत. ही चर्चा किती सफल होते हे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात समजणार आहे.
  • कारण ऑगस्ट महिन्यात अलमट्टी धरण खऱ्या अर्थाने भरू लागते, तेव्हापासून धरणातील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्य्याने केला, तरच धरणातील पाणी नियंत्रण रेषेखाली राहते.
  • महारष्ट्रासाठी कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाच्या पाण्याच्या विसर्गाचे नियोजन करावे, हा चमत्कार जलसंपदा मंत्री जयंत पाटील घडवून आणतील का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(हेही वाचा : 21 जूनपासून काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.