चिंचवड पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली असून मंगळवारी ते अर्ज भरणार आहेत. या जागेवर इच्छूक उमेदवारांची गर्दी लागली होती. अखेर राष्ट्रवादीच्या वतीने नाना काटेचे नाव निश्चित झाले आहे, याबाबतची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील.
महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.@OfficeofUT @NANA_PATOLE
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 7, 2023
‘सहानभुतीवर नाही, तर विकासाच्या जोरावर लढणार निवडणूक’
प्रसार माध्यमांसोबत बोलताना नाना काटे म्हणाले की, ‘ही निवडणुक सहानभुतीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे. तसेच इच्छूकांची गर्दी असली तरी गटबाजी होण्याची शक्यता नाही. कारण आम्ही सर्वजण एक होतो, एकमुखाने आमची मागणी होती की, आमच्या १० ते ११ जणांपैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही सर्व ताकदीने ते काम करू.’
दरम्यान सोमवारी कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मविआकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. असे असूनही सोमवारपर्यंत मविआकडून अर्ज न आल्यामुळे चिंचवडची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा रंगली होती. पण आता चिंचवड जागेसाठी नाना काटे अर्ज भरणार असल्यामुळे या चर्चेला विराम लागला आहे.
(हेही वाचा – बाळासाहेब थोरातांचे गटनेते पद धोक्यात?)
Join Our WhatsApp Community