मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याबद्दल बोलण्यास मनाई केली होती. परंतु, त्यानंतरही मलिक यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर 6 डिसेंबर रोजी वानखेडेंवर टीका केली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मलिक यांना खडसावले आहे. तसेच मलिक यांना 10 डिसेंबर पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तर मलिकांना कोर्टात बोलवावे लागेल
समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखडे यांनी नवाब मलिकांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर आज, मंगळवारी सुनवणी झाली. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांना फटकारले असून 10 डिसेंबरपर्यंत न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सांगितले आहे. न्यायालयाने मनाई केली असतानाही मंत्री मलिक यांनी पुन्हा एकदा वानखडे यांच्यावर टीका केली आहे. वानखडे यांच्या वकिलांनी मलिक यांना 3 डिसेंबर रोजी फेसबुकवर केलेली पोस्ट पुरावा म्हणून सादर केली. यावर नवाब मलिक हे मंत्री म्हणून बोलत आहेत, की वैयक्तिक हे कळायला हवे असे म्हणत न्यायमूर्तींनी नाराजी व्यक्त केली आहे. मलिक जर वैयक्तिक बोलत असतील तर त्यांना कोर्टात बोलवावे लागेल, असेही न्यायमूर्तींनी स्पष्ट केले.
प्रतिज्ञापत्र सादर करा
चैत्यभूमीवर 6 डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीही नवाब मलिकांनी वानखडे यांना अनुसरून भाष्य केल्याचा युक्तीवाद वानखडेंच्या वकिलांनी केला. यावर मलिक यांच्या वकिलांनी ते वक्तव्य मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते या नात्याने केल्याचे न्यायालयात सांगितले आहे. न्यायालयाने मनाई केली असतानाही मंत्री मलिक यांनी पुन्हा एकदा वानखडे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे न्यायालयाने तुमच्यावर का कारवाई करू नये, अशी विचारणा करत मलिकांना त्यांचे मत प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्यास सांगितले आहे. हे आदेश न्यायमूर्ती काथावाला यांच्या खंडपीठाने दिले आहेत. यासंदर्भातील पुढील सुनावणी शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी ठेवण्यात आली आहे.
( हेही वाचा :मुले संस्कृत मंत्रांनी होतात हुशार! परदेशी संशोधकांनी उलगडले रहस्य )
Join Our WhatsApp Community