जळगावात महाआघाडीत बिघाडी! सेना-राष्ट्रवादी आमनेसामने 

128

सध्या महाविकास आघाडीमध्ये वादावादी वाढत आहे. कालपर्यंत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष नाराज होता आणि शिवसेना-राष्ट्रवादीची सलगी होती, मात्र आता सेना-राष्ट्रवादी आमनेसामने येऊ लागले आहेत. जळगावातही याची सुरुवात झाली आहे. त्यामध्ये जळगावमध्ये शनिवारी मध्यरात्री झालेल्या धक्कादायक प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी स्थानिक शिवसेना आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण तापल्यानंतर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील रोहिणी खडसे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे.

काय आहे हे प्रकरण? 

जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहर अध्यक्षांचा शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विनयभंग केल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केला.शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास राष्ट्रवादीच्या मुक्ताईनगर शहराच्या शहर अध्यक्ष नीताताई यांचा मला फोन आला की काही गावगुंड त्यांच्या घराच्या जवळ जाऊन त्यांचा दरवाजा ठोकत आहेत, त्यांना बाहेर ओढत आहेत. अश्लील शिवीगाळ करत आहेत. त्यांनी विनंती केली की ताई तुम्ही तात्काळ इथे या नाहीतर आम्ही जिवंत राहणार नाही. मी जेव्हा त्यांच्या घराजवळ गेले, तेव्हा ते १० ते १५ लोकं पळून गेले, असे रोहिणी खडसे म्हणाल्या आहेत.

(हेही वाचा विधानसभा अध्यक्ष्यांच्या निवडीत राज्यपालांचा हस्तक्षेप?)

दरम्यान, या गावगुंडांनी आपण चंदूभाऊंचे (चंद्रकांत पाटील) कार्यकर्ते असल्याचे सांगितल्याचे देखील रोहिणी खडसे म्हणाल्या. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील आणि इश्वर फाटकर या दोघांना आम्ही पकडू शकलो. त्यांची वागणूक चुकीची होती. मी तिथे असताना माझ्या समोर देखील त्या महिलेला अश्लील शिवीगाळ करणे सुरू ठेवले होते. मी त्यांना समजावले, तेव्हा ते माझ्याही अंगावर धावून आले. मलाही त्यांनी सांगितले की, आम्ही चंदूभाऊंचे कार्यकर्ते आहोत. जर त्यांच्याविरोधात पोस्ट टाकली, तर आम्ही काय आहोत, हे शिवसेना स्टाईलने दाखवून देऊ. तेव्हा पोलिस आले. हा प्रकार पोलिसांच्या समोर घडला आहे, असा दावा रोहिणी खडसे यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.