राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस ते ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार घेणार असून त्यांना 2 नोव्हेंबर रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यामुळे पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
(हेही वाचा – ‘….म्हणून मला वाईट वाटतं, पंतप्रधानांनी विचार करायला हवा’, प्रकल्प गुजरातला जाण्यावरुन राज ठाकरेंचे विधान)
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले की, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. परंतु, शरद पवारांना नेमके काय झाले आहे? याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप दिली नाही. त्यामुळे पवार ब्रीच कँडीत नेमका कशावर उपचार घेणार हेही समजू शकले नाही.
दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांचे २ नोव्हेंबरपर्यंतचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. तर ३ नोव्हेंबरपासून सर्व कार्यक्रम नियोजनाप्रमाणे होतील. पुढे या निवेदनात असेही म्हटले की, ३ नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करू नये, असे आवाहनही या निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.